Wednesday, August 01, 2007

सेकंड क्लासिक!!!

नुकताच मी कानपूर ते नागपूर हा १७ तासांचा प्रवास ट्रेनच्या जनरल डब्यातनं केला. त्याच प्रवासाची ही अरबी कथांइतकी नाही, तरी ब-यापैकी सुरस आणि चमत्कारिक कहाणी....माझा आधीचा प्लॅन होता की रात्री कानपूर स्टेशनला जायचं, तिथून भोपाळचं जनरलचं तिकीट काढायचं आणि आणि मग भोपाळहून सकाळी नागपूरची गाडी पकडायची. पण एवढं सरळसोट नशीब घेऊन जन्माला आलो असतो तर काय हवं होतं?

आधी ब-याचशा कटकटी झाल्यावर, म्हणजे, आदल्या रात्री स्टेशनवर जाणे, तिथे गाड्या बदाबद लेट असणे,५ तास मला हवी असलेली एकही गाडी न येणे, मग रात्री १.३० वाजता परत हॉस्टेलवर जाणे, असे सगळे माझ्या बाबतीत आवश्यक असलेले सोपस्कार करून झालेले होते

तर दुपारी मी स्टेशनवर पोचलो.पुन्हा तिकिट काढलं आणि वाट बघत बसलो. ती गाडी जनरली ५-६ तास लेट असते.पण सुदैवाने, ती त्या दिवशी फक्त १ तास लेट झाली.मी जनरल डब्याच्या दिशेने धावत सुटलो.पहिले २-३ डबे इतके गच्च भरले होते की कोणी आत घुसण सोडाच, पण कोणी हललं असतं तरी लोकं चुरमु-याच्या डब्यातून जास्ती भरलेले चुरमुरे सांडतात तसे सांडले असते.मग मात्र मी तिस-या डब्यात चढायचा निश्चय केला. तिथली लोकं मला म्हटलीच," जगा नहीं ,आगे जाऒ", पण तेव्हढ्यात मला त्या डब्यातनं २-३ लोक उतरताना दिसले, आणि मे ओरडलो," वो देखो, जगा हो गयी.." असं म्हणत मे स्वतःला त्या डब्यात कोंबून घेतलं.

आत पोचल्यावर पहिला अर्धा तास कसाबसा उभा राहिलो. नंतर संधी मिळताच पहिल्या कंपार्टमेंट मधे घुसलो, बॅग हूकला लटकवली आणि जागा मिळायची वाट बघत बसलो.इथे मी स्टेशनवर विकत घेतलेलं कॉमिक्स उपयोगाला आलं. तिथल्या एका माणसानं ते वाचायला मागितलं.ते दिल्यापासून त्याचा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन एकदम बदलला.थोड्याच वेळात, तिथे खाली २ बाकांच्या मधे बसलेलं एक पोरटं उठलं आणि उभं राहिलं.मी तातडीने ती जागा पटकावली, पण खाली बसल्या बसल्या मला लगेच कळलं, की ते पोरगं का उठलं ते. तिथे बसल्यावर मागचं बाक पाठीला जोरदार टोचत होतं.मी तरी तसाच बसलो, हळूहळू मी मी ९० डीग्रीमधे वळलो, आणि माझी पाठ लोकांच्या खाली सोडलेल्या पायांवर खुशाल रेलून दिली. त्या लोकांनी आपले पाय उचलून वर घेतले की तेव्हढ्यापुरतं सरळ बसायचं, खाली सोडले के परत रेलायचं, असा माझा कार्यक्रम सुरू होता.६ तासांनी मला बसायला बाक मिळालं.मी हुश्श केलं. पण मला काय माहित होतं, की प्रवासातली खरी गंमत तेव्हा कुठे सुरु होणार होती ते?

आमच्या वरचे समोरासमोरचे दोन्ही बर्थ खचाखच भरले होते, आणि त्यावर बसलेल्या लोकांनी आपापले पाय विरुद्ध बाजूच्य बर्थवर टेकवले होते. त्यमुळे मी वर पाहिलं की मला फक्त उलट्या-सुलट्या पायांचा समूह दिसायचा. अंधार पडला, तशी त्या पायांमुळे ट्यूबचाही प्रकाश खाली पोचेना, तेव्हा आम्ही खालच्या माणसांनी कलकल करून वरच्यांना प[य बाजूला करायला लावले. माझ्या बाकाच्या बरोब्बर वरती एक अफलातून असामी बसला होता. आपण वरून लोकांच्या अंगावर वेगवेगळ्या वस्तू टाकल्यास त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो ह्याचा बहुदा तो अभ्यास करत असावा. माझ्या बाजूला एक नवरा बायहो आणि त्यांची ३ मुलं असा परिवार बसला होता. त्यातला छोटी मुलगी बाकावर झोपली होती. तर वरून एक चप्पल सरळ त्या मुलीच्या कानसुलावर पडली आणि ती रडतच उठली. वरच्या संशोधकानी सुरवात तर जोरदार केली होती. त्यावर बरीच कलकल झाली. पण वरच्या माणसाचं कुतुहल काही एव्हढ्यावर संपलं नव्हतं. कुठल्यातरी स्टेशनवर त्याच्या चेल्यानी पाणी भरून आणलं. ती बाटली पण अशी नामी निवडली होती, की ती जरा दाबली वरच्या झाकणातून पाणी ओघळून खाली पडायचं. त्याचा पहिला प्रसाद अर्थातच अस्मादिकांना मिळाला. त्या बाटलीतनं पाणी ओघळून सरळ माझ्या हाफ़ पॅंटवर पडलं. परत आम्ही खालच्या लोकांनी कलकल केली, तेव्हा त्यने सॉरी वगरे म्हटलं. पण त्याने हाच प्रयोग तातडीने माझ्या बाजूला बसलेल्या कुटुंबावर केला आणि परत आमचा सर्वांचा कलकलाट सहन केला. मात्र त्याने प्रगती करणं सोडलं नाही.

एका स्टेशनवर त्याने पोळी आणि रसाची भाजी विकत घेतली, आणि अपेक्षेप्रमाणे, त्या भाजीचा नमुना , खालच्या मुलीच्या ड्रेसवर शोभून दिसेल असं वाटल्यामुळे की काय कोण जाणे, त्यावर सांडला. त्यावर मात्र तिच्या आईने बरीच आरडाओरड केली. त्यावर त्यानी दिलेलं उत्तर, मी आयुष्यात विसरणार नाही. तो म्हटला, " अहो काही नाही, तो रस उष्टा नाहीये!!!!!!! " म्हणजे तो ड्रेसवर पडलेला रस त्या मुलीने चाखून, तो उष्टा असल्यामुळे एव्हढी आरडाओरड करते आहे, असा बहुधा त्याचा समज झाला असावा.

ह्या सगळ्या प्रकावर, हसता हसता मला कधी पेंग आली ते कळलंच नाही. एकदम पहाटे नागपूर आल्यावर माझ्या बाजूच्याने मला उठवलं, आणि मी सामानासकट स्टेशनवर उतरून, मला घ्यायला आलेल्या माझ्या मित्राला जाऊन भेटलो. त्याला हा सगळा किस्सा कधी एकदा सांगेन असं मला झालं होतं. मी आलो होतो सेकंड क्लासमधून, पण मला आलेला हा अनुभव नक्कीच हिंदी सिनेमातल्या हिरोच्या B.A. डीग्रीसारखा "फर्स्ट क्लास फर्स्ट" होता!!!

Monday, July 02, 2007

खोली

आत्ताच एका मित्राशी चॅट करत होतो. तो म्हणत होता की तो पुण्यात एक भाड्याची खोली शोधतोय. हे शब्द ऎकले अणि एकदम ही कविता सुचली, अगदी spontaeneously!!!!

मला त्या दिवशी एक साधू भेटला-

मी म्हटलं ," काय करता?"

तो म्हणे--"शोध घेतोय खोलीचा"..

मी म्हटलं," येडछापच दिसतोय.."

नंतर भेटला एक मित्र-

तोही म्हणे-"शोध घेतोय खोलीचा"

मी बुचकळ्यात..

नंतर एकदम ट्यूब पेटली

दोघंही खोलीचाच शोध घेत होते-

पहिला मनाच्या आणि दुसरा राहण्याच्या...........

Monday, June 25, 2007

बायको

आमच्या बायकोचं सगळं जरा जास्तीच,

बोलणं तर विचारूच नका-

परवाचीच गोष्ट

वटसावित्रीच्या पूजेला, ही म्हणे

सगळ्या बायकांच्या आधी वडाच्या झाडाला

सूत गुंडाळायला पोचली,

आणि मग दिवसभर जेव्हा घरात बोलायला दुसरा विषयच नव्हता,

तेव्हा मी मनात म्हट्लं-

"हिला काय म्हणावं? तूच माझी वटसावित्री, की-

वटवट सावित्री???????? "

Sunday, June 17, 2007

कोटी..

पोलिसांनाही कोट्या करता येतात

हे मला तेव्हा समजलं-

जेव्हा मी सचिन तेंडुलकरची गाडी चोरून पळून गेल्यावर,

त्यांनी मलाच 'फरारी' घोषित केलं...........

Thursday, March 29, 2007

द्वैत.

सकाळी उठल्यापासून "त्या"ची कटकट सुरू होते.९ वाजता क्लास असतो, म्हणून वास्तविक मी चांगला ८ वाजताचा अलार्म लावून ठेवतो.तो बरोबर ८ला वाजतोही. आणि मला जागही येते.ह्या तिन्ही गोष्टी एकदम घडल्याच्या आनंदात मी उठतो आणि खोलीचं दार उघडतो न उघदतो तोच त्याचा आवाज येतो," काय ९ वाजता क्लास आहे ना? मग आत्तापासून उठून काय दिवे लावणार आहेस घोड्या?झोप परत. ८ला उठतोय लेकाचा." ह्या भीषण भडिमारापुढे मी सपशेल शरणागती देतो आणि निमूटपणे कॉटवर आडवा होतो आणि ८:२० चा अलार्म लावतो. आता तसं पहायला गेलं तर ८:२० आणि ८:३० मधे असा कितीसा फरक आहे म्हणा! त्यामुळे अर्थातच मी ८:२०च्या ऎवजी ८:३० ला दचकून उठतो. डोळ्यासमोर instructor चे भयावह मुद्रा तरळते आणि मी ताड्कन जागा होतो आणि पुन्हा एकदा मगाशी बंद केलेले दार उघडतो. ह्यावेळी मात्र तो काही बोलत नाही. ही त्याची मूक संमती समजून मी आन्हिकं उरकायला लागतो. फक्त दात घासून रात्री घातलेली हाफ पॅंट बदलून त्यातल्या त्यात स्वछ बाहेर घालायची पॅंट घालणे ह्या क्रियेला hostelite विद्यार्थ्यांमधे आन्हिकं असंच म्हणतात. मग मी आणि तो बरोबरच क्लासला जायला निघतो. तेही एकाच सायकलवर.क्लासमधे मात्र तो मला त्रास द्यायला येत नाही.मात्र क्लास सुटला की रावजी हजर!

सतत मजा करणं हा त्याचा स्वभाव. मलाही तो त्याच्याबरोबर ओढून नेतो. मी तरी दर वेळी का त्याच्यामागे जातो कळत नाही.कधी कधी मात्र मी बंड पुकारून त्याच्याबरोबर जायचं नाकारतो. तो चिडतो, धुसफुसतो, आणि रागावून निघून जातो. माझाही नाईलाज असतो. काही महत्वाचा अभ्यास संपवणं अतिशय गरजेचं असतं.गेला तर गेला! येईल झक मारत परत! त्याला माझ्याशिवाय दुसरं आहेच कोण! मी त्याच्यशी दिवसभर बोलत असतो. एखाद्या प्रसंगी कसं वागावं, कसं बोलावं ह्यावर तो मला सारखं सुनावत असतो.मलाही त्याचे लेक्चरबाजी अजिबात कंटाळवाणी वाटत नाही. इतकच काय, मुलींशी कसं बोलावं हेही तच मला शिकवतो!तो काय मुलींशी बोलण्यात expert वगैरे आहे अशातला भाग नाही. पण सारखे सल्ले द्यायची सवय!त्याला कोण काय करणार?

रात्री बिछान्यावर पडल्यावर मात्र आमचा हा दिवसभर चाललेला, मनातला संवाद मी संपवतो. 'तो', म्हणजे माझ्याच मनात दडलेला एक दुसरा 'मी' ,आम्ही दोघंही शांतपणे झोपी जातो, उद्या सकाळच्या ८:०० वाजताच्या अलार्म ची वाट बघत!

Friday, March 16, 2007

भविष्य

गिरीश रानडे हा एक सर्वसामान्य उच्चशीक्षित तरूण होता. लग्न,संसार सारं काही सुरळीत सुरू होतं.एकंदरीत सुखवस्तू म्हणतात तसला गृहस्थ. एकच समस्या होती. त्याचा ज्योतीषावर जरा जास्त विश्वास होता. हे त्याच्या बायकोला अजिबात आवडायचं नाही. ती त्याला सारखं म्हणायची, हे तुझं ज्योतीषच एक दिवशी आपला घात करेल.पण तिचं भविष्य एवढ्या भयानक रितीने खरे ठरेल असं त्याल स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं........

त्या दिवशी गिरीष जरा लवकर कामावर निघाला होता.जाताना वाटेत, त्याला त्याच्या गाडीतून, कोप-यावर एक ज्योतिषी बसलेला दिसला.लगेच त्याला वाटलं, चला बघुया तर खरं काय लिहीलंय आपल्या भाग्यात आज! लगेच स्वारीने गाडी तिकडे वळवली.ज्योतिषाने जे भविष्य सांगितलं ते ऎकून मात्र गिरीष हादरला.त्याला क्षणभर काही सुचेनाच. जरा भानावर आल्यावर त्याने विचार केला," जर हे भविष्य मला खोटं ठरवायचं असेल, तर मला आज कोणाशीही भेटून चालणार नाही. आजचा दिवस अगदी एकट्याने घालवायला हवा." त्याने लगेच बायकोला फोन करून सांगितलं," मला आज तातडीचं काम निघालं आहे, त्यासाठी बाहेरगावी जावं लागेल. मी उद्या सकाळी परत येईन." त्याने तडक गाडी मागे वळवली, आणि शहरातलं एका चांगल्याशा हॉटेलात गेला. तिथे एका दिवसापुरती खोली भाड्याने घेतली. उरलेला संपूर्ण दिवस त्याने खोलीवरच काढला. जेवणही तिथेच मागवलं. त्या रात्री,ते भविष्य आपण टाळलं असा विचार करत तो शांतपणे झोपला. पण नियती थोडीच झोपी जाते? तिचे पडद्यामागचे खेळ सुरूच असतात...

दुस-या दिवशी सकाळी गिरीष उठला. प्रातर्विधी उरकून त्याने वेटर्ने सकाळेच बाहेर आणून ठेवलेला पेपर उचलला.पहिल्या पानावरची ती बातमी पाहून तो हादरलाच!

"नामवंत सर्जन डॉ. गिरीष रानडे ह्यांच्या पत्नीचे अपघाती निधन"

काल दुपारी, नामवंत सर्जन डॉ.गिईष रानडे ह्यांच्या पत्नी, सौ.प्रमिला रानडे, बाजारःआत करून परत येत असताना त्यांच्या दुचाकीला एका भरदाव ट्रकने धडक मारली.सौ.रानडे जागीच बेशुद्ध झाल्या. जमावाने त्यांना जवळच्याच हॉस्पीटलमधे भरती केलं. योगायोग म्हणजे ते हॉस्पीटल त्यांचे यजमान डॉ.गिरीष रानडे यांचच होतं.पण हॉस्पीटल मधल्या स्टाफने सांगितलं की आज डॉक्टर हॉस्पीटल मधे आलेच नाहीत, व त्यांचाही मोबाईलही बंद होता .सौ. रानडेंचं तातडीने ऑपरेशन करणं गरजेचं असल्यामुळे त्यांना नाईलाजाने दुस-या होस्पीटलमधे भरती करण्यास न्यावं लागलं. दुर्दैवाने वाटेत ambulance ट्रॅफिक जॅम मधे अडकल्याने दुस-या हॉस्पीटलला पोचायच्या आतंच त्यांचं निधन झालं. त्यानंतर अजुनही डॉक्टरांशी संपर्क होऊ शकलेला नाही.....

भोवळ येऊन पडण्यापुर्वी गिरीषला ज्योतिषाचं भविष्य आठवत होतं, " आज तुमच्या चुकीमुळे अथवा निष्काळजीपणाने, तुमच्या एखाद्या प्रिय व्यक्तीच्या जिवाला धोका पोचू शकेल..............."Monday, February 26, 2007

सुटका..

६ वर्षांचा गंपू त्यच्या घराच्या एक कोप-यात अवघडून बसला होता. त्याच्या घरात आज बरीच वर्दळ सुरू होती. पोलीसही आले होते."पंचनामा", "विषप्रयोग" असले काही शब्द त्याच्या कानावर पडत होते. पण त्यांचा अर्थ कळण्याएवढा तो अजुन मोठा झाला नव्हता.....

गंपू ४ वर्षांचा असतानच त्याची आई गेली. बाबांनी वर्षभरातच नविन लग्न केलं होतं. गंपूचे बाबा म्हणजे त्या शहरामधली एक बडी असामी होते. श्रीमंत, कर्तबगार, कर्तृत्ववान माणूस.त्याच्या सावत्र आईने त्याच्या बाबांशी लग्न केलं, ते केवळ त्यांच्या पैशांच्या मोहाने, ही गोष्ट सूर्यप्रकाशाइतकी स्वछ होती.त्यांच्या पैशावर मनसोक्त मजा मारणे हेच तिचे काम होतं.त्यामुळे त्यांची बरीच भांडणंही होत.ह्या सर्व त्रासामुळे त्याच्या बाबांना दारूचे व्यसन लागलं होतं. निद्रानाशाचा विकारही जडला होता. रात्रभर दारू पिऊन ते पहाटे कधीतरी झोपी जात.

साहजिकच त्या व्यसनांपायी गंपूचे बाबा त्याच्याकडे दुर्लक्ष करू लागले होते.ते त्यच्याशी दोन शब्दही धड बोलत नसत.त्याला फ़ारसे मित्रही नव्हते. त्यामुळे शाळेतून घरी आलं की गंपूला घर खायला उठायचं.नाही म्हणायला त्याची मावशी त्याच शहरात रहायची. तिला स्वतःचं मुलबाळ नसल्यामुळे तिचा गंपूवर फार जीव होता. तिच्याकडे जायला मात्र त्याला फार आवडायचे. ती त्यच्यासाठी छान छान पदार्थ करून त्याचे सगळे लाड पुरवायची. गंपू तिला अनेकदा विचारायचा देखील, "मावशी, मला कायमचं तुझ्याकडे नाही रहाता येणार?"
त्यावर ती काय बोलणार? नुसतं हसून ती विषय बदलायची.

त्याच्या बाबांच्या खुनाच्या आरोपावरून त्याच्या सावत्र आईला अटक झाली.काल रात्री ते दोघंही रोजच्याप्रमाणे भरपूर दारू पिऊन झोपून गेले होते. सकाळी बघितलं तेव्हा मात्र त्याचे बाबा जिवंत नव्हते.दारूतनंच विष दिलं असावं असा पोलिसांचा संशय होता.खुनाला सबळ कारणही होतं.त्याच्या बाबांनी उतरवलेल्या विम्याला नुकतंच एक वर्ष पुर्ण झालं होतं. त्यामुळे आता त्यांचा मृत्यू झाला असता, तर कायद्याप्रमाणे, ती सगळी रक्कम त्याच्या आईला मिळणार होती. त्याच्या मावशीनं ह्यापुढे त्याची काळजी घ्यायचं मान्य केलं होतं.त्यामुळे मात्र गंपू खूष झाला होता.

त्या रात्री मावशीच्या घरी जेवताना गंपू तिला म्हटला, " मावशी, माझ्या दुस-या आईने बाबांचा मर्डर केला असं पोलिस सांगत होते. मर्डर म्हणजे काय गं? ?"

"तुला नाही कळायचं ते इतक्यात. अजुन लहान आहेस तू."

"आणि मावशी, परवा नाही का मी तुला विचारलं तेव्हा तू म्हणत होतीस , की ते सीरियल मधे दाखवतात ते सगळं खोटं असतं म्हणून.. "

"हो रे बाळा. चुकलं माझं. तशा हलकट बायका खरोखरंच असतील असं वाटलं नव्हतं मला."

" मग मी , त्या सीरियलमधल्या बाईप्रमाणे, काल बाबांच्या झोपेच्या गोळ्या त्यांच्या दारूत हळूच मिसळल्या, तशा माझ्या दुस-या आईच्या दारूत मिसळल्या, तर तीही देवाघरी जाईल?
सांग ना मावशी.. मावशी? तुला काय झालं? तू एवढी घाबरली का आहेस?तुला काय होतंय? मावशी!!! मावशी!!............"

Saturday, February 24, 2007

बिन विषयाच्या चारोळ्या

१. स्वतः स्वतःशीच बडबडण्याचा,
आता कंटाळा यायला लागलाय,
म्हणून तर हा पठ्ठ्या,
आता चारोळ्या व्यायला लागलाय!!

२.बिन विषयाच्या लेखावर,
ही एक बिन विषयाची चारोळी,
शब्दांच्या जंगलातली,
एक फुकट गेलेली आरोळी!!

३. नव्वद टक्के चारोळ्या,
ह्या प्रेयस्यांवरती का असतात?
बाकी जग सोडून,
ह्यांना फक्त मुलीच का दिसतात?

४. मोठा चारोळीकार बनावं,
असा मनात ध्यास आहे,
तेवढ्या चारोळ्या काही सुचत नाहीत,
हाच फक्त त्रास आहे!!

५. चारोळीला विषय हवा,
असा वाचणा-यांचा आग्रह असतो,
माझ्या चारोळीला विषय नसणार,
असा मग माझाही निग्रह असतो!!

६. सगळे जर करतात,
तर माझीही एक चारोळी एका मुलीवर,
तिचे रूप, तिचे डोळे,तिचे बोलणे आठवून
माझे हृदय होते खालीवर!!!!

Thursday, February 22, 2007

अगम्य भाषेत लिहिणा-यांनो.....

अगम्य भाषेत लिहीणा-यांनो,तुम्हाला माणसांच्या भाषेत का लिहीता येत नाही? आपण असलं काहीतरी आचरटासारखं लिहीलं म्हणजे त्याचं साहित्यीक मूल्य वगैरे वाढेल असं वाटतं की काय तुम्हाला?


साधं उदाहरण घ्या. समजा एखाद्या गोष्टीत असा प्रसंग आहे. एक प्रियकर आणि त्याची प्रेयसी चौपाटीवर उदास नजरेने, सूर्यास्त बघत कसलासा विचार करत बसलेत आणि तो तिला काहीतरी सांगायला जातो. बस्स, प्रसंग एवढाच असतो. आता हे अ.भा.लि.( तेच ते वरचे, अगम्य भाषेत लिहीणारे) लोक त्याचं वर्णन कसं करतात बघा.

सूर्यास्ताची वेळ झाली होती. सूर्याचं पूर्णबिंब हळूहळू पाण्यात बुडायला लागलं होतं. ते मनोहर दृश्य बघताना त्या दोघांच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं( हा "काहूर" शब्द ह्या लोकांना फार आवडतो. जिथे संधी मिळेल तिथे तो लेंडी सारखा टाकत जातात.).कदाचित भविष्याची स्वप्न पडत असतील त्या दोघांना.दूर सागरामधे मच्छीमार परत यायची तयारी करताना दिसत होते(आता वास्तविक ह्याचा काय संबंध आहे?.. पण नाही. सुरू आहे ह्यांची वातावरण निर्मीती.....)सगळा आसमंत त्या समुद्राच्या विशिष्ट वासानी धुंद झाला होता.( कुठल्याही कारणानी ह्यांचा आसमंत धुंद व्हायला वेळ लागत नाही. मग ते समूद्र असो, धुके असो, अत्तर असो वा आणखी काही असो.जणू काही तो धुंद व्हायलाच टपलेला असतो.).त्या धुंद (पुन्हा धुंद!!) वातावरणात त्याने आपला हात तिच्या हाताच्या दिशेने सरकवला. ( हरे राम! अजुन हात पण हातात घेतलेला नाही. हे तर त्या "दामिनी" serial च्या वरताण व्हायला लागलंय!!)अखेरीस त्याने तिचा हात हातात घेतला( हुश्श!!!) व दुस-या हाताने तिचे मुखकमल(??) आपल्याकडे वळवले. तिच्या टपो-या डोळ्यात पाणी तरारलं होतं.( नायिकेचे डोळे टपोरे नसले तर जणू काही यांचे पितर नरकात खितपत पडतील.) . भास्कराचे( इथे सूर्याला काहीतरी भरदार शब्द हवाच!) मावळते प्रतिबिंब त्या अश्रूत दिसत होते. ते बघून तो तिला म्हणाला,".....


हे एवढं वर्णन वाचेपर्यंतच त्या लेखकाला एवढ्या शिव्या मोजाव्याश्या वाटतात की पुढे वा़चायची इच्छा आणि त्राण, दोन्ही संपून जातं.अरे शिंच्या, तो तिला काय म्हटला ते सांग की लवकर. हा आधीचा नसता केरकचरा कशाला? हे असले लिहीणारे धन्य, आणि वाचणारे त्याहून धन्य!!


विहीरीमधे मीठ टाकून तिचे पाणी खारं केलं म्हणजे काय तिचा समूद्र थोडीच बनतो?उलटं त्या विहीरीपाशी येऊन पाणी पिणारे लोकही यायचे बंद होतात.जे काय लिहायचं ते सामान्य माणसाला वाचून कळेल, व पुढे वाचावसं वाटेल, असं लिहावं की. हे नसत्या शब्दांच्या मीठाचे ढिगारे टाकून लेखन खारं कशाला बनवायचं ?

Tuesday, February 20, 2007

एक फालतू कविता(?)....

कविता करण्यास बसलो आहे
पण करता येत नाही !!

आधी शब्द सापडत नाही,
आणि सापडला तर...
तो हवा तो अर्थ घेत नाही !!

यमके जुळवायची सारी खटपट,
ती जुळत नाहीतच, जुळली तरी....
त्यांची कविता होत नाही! !!

लिहायचं असतं काहीतरी अर्थगर्भ,
शब्दांचं एक घट्ट मिश्रण, ही असली
शब्दांचे बाण हवेत नाही!!

म्हणता म्हणता झाली तीन कडवी(अगदी नावाप्रमाणेच कडू..)
आणि हे चौथं( की चोथा?), तरीही..
हवा तो अर्थ अभिप्रेत नाही!!

Tuesday, January 16, 2007

प्रतिबिंब....

"आजोबा, गोष्ट सांगा, गोष्ट सांगा.." लंपन आणि त्याच्या दोस्तांनी एकच गिल्ला सुरू केला.आज लंपन पूर्ण फौजच बरोबर घेऊन आला होता. त्याला हे बागेतले आजोबा खूप आवडत.कारण लंपन बागेत आला की रोज ते त्याला एक तरी गोष्ट सांगत.आजोबांनी हसून एकदा सगळ्यांकडे बघितलं, आणि मग गोष्ट सुरू केली. " एका जंगलात, एक राक्षस रहात होता..." . "नाही नाही, ही नको. राक्षसांच्या खूप गोष्टी ऎकल्यात आम्ही. आम्हाला मुलांची गोष्ट ऎकायची आहे." लंपन म्हणाला.
"मुलांची? बरं बाबा. पण तुमच्या पेक्षा थोड्या मोठ्या मुलांची गोष्ट आहे बरं का! कॉलेजातल्या मुलांची गोष्ट आहे ही."
" एकदा काय झालं, एका कॉलेजमधल्या मुलांनी ठरवलं, की एक नाटक करायचं. तुम्ही कसं गॅदरिंगला लहानसं नाटक करता ना, तसंच.आता ही मुलं मोठी. म्हणून त्यांचं नाटकही मोठं.त्या नाटकाचं नाव होतं, " तुझे आहे तुजपशी!!"
आता मुलं जरा कान टवकारून बसली.ही गोष्ट ते पहिल्यांदाच ऎकत होते.
"त्या नाटकात कोण कोण होतं माहितीय? आचार्य होते, काकाजी होते,श्याम, वासूअण्णा,गीता, उषा,जगन्नाथ, भिकू,सतीश ही सगळी मंडळी होती."
मुलं एकमेकांकडे बघायला लागली. त्यांना कळेचना, की ही सगळी मंडळी नक्की कोण ते.लंपननीच मग धीर करून विचारलं, " पण आजोबा,त्यांची खरी नावं काय होती?"
आजोबा स्वतःशीच हसले. " खरी नावं? तुमच्या गोष्टीतल्या राजपुत्रांची खरी नावं काय असतात रे?". लंपन गोंधळला.

आजोबा पुढे म्हटले," आपण आत्ता तरी त्यांना त्यांच्या नाटकातल्या नावानेच बोलावूया. हं, तर ते काकाजी होते ना, ते अगदी थेट तुमच्यासारखे होते.म्हणजे तुमच्यासारखेच मजा करायचे, अधूनमधून दुस-यांना चिडवायचे, आणि स्वतःशीच मस्त हसायचे. त्यांच्या बरोबर विरूद्ध म्हणजे आचार्य. ते होते तुमच्या टीचरांसारखे. सारखे रागवायचे, चिडायचे आणि दुस-यांना आपल्या धाकात ठेवायचे.आयुष्यात कधीही मजा न करता अगदी साधं रहावं, असं सांगायचे.तर हे आचार्य, एकदा काकाजींकडे रहायला आले बरं का! म्हणजे, उषाला, म्हणजे काकाजींच्या पुतणीला ,आचार्यांबद्दल खूप आदर होता, म्हणून तिने त्यांना आपल्या घरी आणलं.झालं! तो श्याम, उषाचा भाऊ, म्हणजे एकदम भोळा बरं का!त्याच्या समोर कुणी काही अधिकारानं बोललं, की लगेच त्याच्या मागे जायचा.साहजिकच श्यामला आचार्यांबद्दल खूप आदर वाटायला लागला.तो अगदी आचार्यांसारखं वागायला लागला.पण तेव्ढ्यात एक गंमत झाली. श्यामचं आणि गीताचं, म्हणजे त्या आचार्यांच्या मानलेल्या मुलीचं, ते सिनेमात हिरो-हिरॉईनचं असतं ना, तस्सं सुरू झालं.आता श्यामला कळेना, की आचार्यांच्या मागे जावं, की गीतेच्या?मग त्याला काकाजींनी समजावलं, " अरे श्याम, तू आता मोठा आहेस, कोणी सांगतं म्हणून नव्हे, तर तुला जे पसंत पडेल तसं वागत जा.तुझं मन त्या गीतेच्या मागे जातंय, आणि तू त्या आचार्यांच्या मागे जातोस?"श्यामला पटलं. शेवटी मग आचार्यांनाही कळलं, की आपण चुकीचं सांगतोय ते.मग त्यांनी श्याम आणि गीताला लग्नाची परवानगी दिली, आणि आपण एकटेच निघून गेले, आपला मार्ग शोधत......"
एवढं बोलून आजोबा थांबले.

"पण आजोबा, ही तर मोठ्या माणसांची गोष्ट आहे. तुम्ही मुलांची गोष्ट सांगणार होतात ना?"

" अरेच्च्या! हो की! विसरलोच होतो! हं, तर त्या मुलांची गोष्ट. त्या सगळ्या मुलांचं एकत्र असण्याचं ते त्या कॉलेजमधलं शेवटचं वर्ष होतं.वर्षभर त्यांनी खूप मजा केली, अनेक गप्पगोष्टी केल्या, आणि वर्ष संपल्यावर निघून गेले सगळे, आपापले मार्ग शोधत...."

" संपली गोष्ट? मग ते सगळे मित्र पुन्हा नाही भेटले आजोबा?"

आजोबा स्वतःशीच हसले. " काय रे, तुम्ही मुलं बागेत खेळायला येता की गोष्टे ऎकायला? चला, पळा खेळायला!" मुलं निघून गेली. काही वेळ आजोबा एकटेच बसून होते. थोड्या वेळानी कानावर हाक आली. "अहो अण्णा अजून इथेच काय बसून राहिलाय? माझी फेरी मारून संपली देखील. चला आता घरी."

त्या कॉलेजमधल्या नाटकात " वासूअण्णा " झालेल्या आजोबांनी, त्यांना हाक मारणा-या, त्याच नाटकातल्या "काकाजीं"कडे वळून बघितलं. बाकावरून उठले, आणि मग ते दोघंही, काठ्या टेकत टेकत, मावळत्या सूर्याकडे पहात, जुन्या आठवणी जागवत, आपापल्या घराची वाट चालू लागले.

(कदाचित बाहेरच्या लोकांना ह्याचा खरा अर्थ समजणार नाही. त्या नाटकात वासूअण्णा मीच झालो होतो. हा लेखात मी भविष्यात घडू शकणारी एक घटना लिहीली आहे. आत्ता माझे वय फक्त २२ वर्षं आहे.)