Wednesday, May 20, 2009

हुश्श्श...

वर्षभर एका exam साठी कुथ कुथ कुथल्यावर , आणि ती exam संपल्यावर अस्सच वाटतं. पण UPSC च थोडसं वेगळं आहे. तुम्ही हुश्श करेपर्यंत पु्ढचा अभ्यासाचा डोंगर तयार असतो. उपसा तिच्यामायला!! आत्तापर्यंत फक्त सम्राट अशोकनं कुठल्या दगडावर काय काय कोरून ठेवलंय हे लक्षात ठेवायला लागायचं. आता mains (जर prelim clear झालो तर) मधे ते त्याने तसं का लिहिलं हे पण लक्षात ठेवायला लागणार!!
पण आता रिंगणात उतरलोच आहे तर मागे येऊन चालत नाही. ते कुठ्ल्याशा soft drink चं घोषवाक्य (caption ला दुसरा शब्द सापडेना मला) आहे ना, "डर के आगे जीत है.. " फक्त असं म्हणून ते actors लगेच ते पेयं घश्याखाली ओततात. तिथे exam मधे घशाला कोरड पडल्यावर काय करायचं ते सांगत नाही कुणी!! गेल्या रविवारी UPSC ची prelim दिली तो एक अगदी नवा अनुभव होता. ’marwari commercial college and high school" असं भारदस्त नाव सांगणा-या अत्यंत जुनाट शाळेत नंबर लागला होता. तिथे पार उकडीचा मोदक झाल्यावर (उकडीचे मोदक उकडूनच करतात ना? नसल्यास कोटी फुकट गेली असं समजून पुढे वाचा..) मी बाहेर आलो, मी select होईन का नाही हे नक्की सांगता येत नव्ह्तं, म्हणजे अजूनही सांगता येत नाहीये..
पण घरी आल्यावर मी शांतपणे विचार केला. मागच्या वर्षाचा. नक्की काय मिळवलं (असलच तर) आणि काय घालवलं याचा. लौकिक अर्थाने बघायचं झालं तर दुस-या यादीत ब-याच गोष्टी येतील. म्हणजे, आयुष्यातल्या उमेदीच्या काळातलं एक वर्ष, मागच्या M.tech ची दोन वर्षं, शिवाय घरच्यांची आधी थोडीशी ह्या वेगळ्या वाटेबद्दलची नापसंती इत्यादी.
पण हे एकच वर्ष असं होतं की I was doing exactly what I wanted to!!
गैरसमज नसावा. मी B.E. केलं, IIT Kanpur मधून M.Tech केलं ते मला आवडलं नाही असं नाही. पण ते मला सहज मिळालं आणि मिळाल्यावर ते आवडायला लागलं. This time it was my choice, and on my terms!!
UPSC च्या अभ्यासाने बाकी माहित नाही, पण मला एक चांगला भारतीय बनवलं आहे. I am not a man who wears his patriotism on his sleeve, पण काही वर्षांपुर्वी जी मानसिकता होती, की आपल्याला काय करायचंय कुठलंही सरकार आलं तरी, गप गुमान नोकरी करायची आणि कुटुंबाची काळजी घ्यायची, बास्स्स्स!! ती मात्र पार बदललली आहे. म्हणजे अजुनही वरच्या वाक्यातले शब्द तेच आहेत, फक्त कुटुंबाची व्याख्या मात्रं खूप विस्तारली आहे!!!

Tuesday, September 09, 2008

हॅलो हॅलो..फोन इन...

नुकताच मी विविधभारती वरती एक phone in कार्यक्रम ऐकला. त्यातले काही अफलातून संवाद:-

१)
caller: (गाणं सांगतो. सांगताना मागे prompting केल्याचे आवाज.)
निवेदिका: तुमच्या मागून बराच आवाज येतोय. खूप लोकं जमलेली आहेत वाटतं.
ca: नाही, माझी बायको आहे फक्त.
नि : (give up) अच्छा. बरं बरं......
{मी : (हसून हसून give up)}
त्याच फोन मधला हा पुढचा संवाद
नि: काय करतो तुमचा भाऊ?
ca:गुरांचा दवाखाना आहे त्याचा.
नि : (उगाच काहीतरी बोलायचं म्हणून) हो ना, आसपास खूप शेतकरी असल्यामुळे सारखी गरज पडत असेल ना?
{मी: (आता शेतकरी स्वतःच्या इलाजासाठी गुरांच्या doctor कडे का जाईल हे न कळल्यामुळे क्षणभर संभ्रमात. नंतर शेतक-याच्या गुरांचा point लक्षात आल्यावर उलगडा. उलगडा झाल्यावर give up)}

दुसरा call

ca: ... आज तुम्हाला दोन महिन्यांनी परत फोन केला आहे.
नि : हो ना. खरंच तुमचं कौतुक केल पाहिजे. कारण इथे तेच तेच लोक फोन करतात. (बाई, हे असं सांगायचं नसतं) तुम्ही स्वतःवरच निर्बंध घालून घेतलेत हे फारच चांगलं केलंत. म्हणजे दोन महिने तुम्ही इथे फोन नाही करायचा असं स्वतःहून ठरवलत याबद्दल आभारी आहे.
{मी: (निवेदिकेचं हे मत ऐकून महाप्रचंड give up.. यानंतर मी कार्यक्रम ऐकणं बंद केलं.)}

(by the way, ह्या वरच्या इसमाने "मला जुनी गाणी आवडतात " असं सांगून "जिंदा" पिक्चर मधलं "जिंदा हू मैं" ह्या गाण्याच्या "remix" ची फर्माईश केली होती. आता तुमची पाळी, give up ची!!!)


Wednesday, August 01, 2007

सेकंड क्लासिक!!!

नुकताच मी कानपूर ते नागपूर हा १७ तासांचा प्रवास ट्रेनच्या जनरल डब्यातनं केला. त्याच प्रवासाची ही अरबी कथांइतकी नाही, तरी ब-यापैकी सुरस आणि चमत्कारिक कहाणी....



माझा आधीचा प्लॅन होता की रात्री कानपूर स्टेशनला जायचं, तिथून भोपाळचं जनरलचं तिकीट काढायचं आणि आणि मग भोपाळहून सकाळी नागपूरची गाडी पकडायची. पण एवढं सरळसोट नशीब घेऊन जन्माला आलो असतो तर काय हवं होतं?

आधी ब-याचशा कटकटी झाल्यावर, म्हणजे, आदल्या रात्री स्टेशनवर जाणे, तिथे गाड्या बदाबद लेट असणे,५ तास मला हवी असलेली एकही गाडी न येणे, मग रात्री १.३० वाजता परत हॉस्टेलवर जाणे, असे सगळे माझ्या बाबतीत आवश्यक असलेले सोपस्कार करून झालेले होते

तर दुपारी मी स्टेशनवर पोचलो.पुन्हा तिकिट काढलं आणि वाट बघत बसलो. ती गाडी जनरली ५-६ तास लेट असते.पण सुदैवाने, ती त्या दिवशी फक्त १ तास लेट झाली.मी जनरल डब्याच्या दिशेने धावत सुटलो.पहिले २-३ डबे इतके गच्च भरले होते की कोणी आत घुसण सोडाच, पण कोणी हललं असतं तरी लोकं चुरमु-याच्या डब्यातून जास्ती भरलेले चुरमुरे सांडतात तसे सांडले असते.मग मात्र मी तिस-या डब्यात चढायचा निश्चय केला. तिथली लोकं मला म्हटलीच," जगा नहीं ,आगे जाऒ", पण तेव्हढ्यात मला त्या डब्यातनं २-३ लोक उतरताना दिसले, आणि मे ओरडलो," वो देखो, जगा हो गयी.." असं म्हणत मे स्वतःला त्या डब्यात कोंबून घेतलं.

आत पोचल्यावर पहिला अर्धा तास कसाबसा उभा राहिलो. नंतर संधी मिळताच पहिल्या कंपार्टमेंट मधे घुसलो, बॅग हूकला लटकवली आणि जागा मिळायची वाट बघत बसलो.इथे मी स्टेशनवर विकत घेतलेलं कॉमिक्स उपयोगाला आलं. तिथल्या एका माणसानं ते वाचायला मागितलं.ते दिल्यापासून त्याचा माझ्याकडे बघायचा दृष्टिकोन एकदम बदलला.थोड्याच वेळात, तिथे खाली २ बाकांच्या मधे बसलेलं एक पोरटं उठलं आणि उभं राहिलं.मी तातडीने ती जागा पटकावली, पण खाली बसल्या बसल्या मला लगेच कळलं, की ते पोरगं का उठलं ते. तिथे बसल्यावर मागचं बाक पाठीला जोरदार टोचत होतं.मी तरी तसाच बसलो, हळूहळू मी मी ९० डीग्रीमधे वळलो, आणि माझी पाठ लोकांच्या खाली सोडलेल्या पायांवर खुशाल रेलून दिली. त्या लोकांनी आपले पाय उचलून वर घेतले की तेव्हढ्यापुरतं सरळ बसायचं, खाली सोडले के परत रेलायचं, असा माझा कार्यक्रम सुरू होता.६ तासांनी मला बसायला बाक मिळालं.मी हुश्श केलं. पण मला काय माहित होतं, की प्रवासातली खरी गंमत तेव्हा कुठे सुरु होणार होती ते?

आमच्या वरचे समोरासमोरचे दोन्ही बर्थ खचाखच भरले होते, आणि त्यावर बसलेल्या लोकांनी आपापले पाय विरुद्ध बाजूच्य बर्थवर टेकवले होते. त्यमुळे मी वर पाहिलं की मला फक्त उलट्या-सुलट्या पायांचा समूह दिसायचा. अंधार पडला, तशी त्या पायांमुळे ट्यूबचाही प्रकाश खाली पोचेना, तेव्हा आम्ही खालच्या माणसांनी कलकल करून वरच्यांना प[य बाजूला करायला लावले. माझ्या बाकाच्या बरोब्बर वरती एक अफलातून असामी बसला होता. आपण वरून लोकांच्या अंगावर वेगवेगळ्या वस्तू टाकल्यास त्याचा त्यांच्यावर काय परिणाम होतो ह्याचा बहुदा तो अभ्यास करत असावा. माझ्या बाजूला एक नवरा बायहो आणि त्यांची ३ मुलं असा परिवार बसला होता. त्यातला छोटी मुलगी बाकावर झोपली होती. तर वरून एक चप्पल सरळ त्या मुलीच्या कानसुलावर पडली आणि ती रडतच उठली. वरच्या संशोधकानी सुरवात तर जोरदार केली होती. त्यावर बरीच कलकल झाली. पण वरच्या माणसाचं कुतुहल काही एव्हढ्यावर संपलं नव्हतं. कुठल्यातरी स्टेशनवर त्याच्या चेल्यानी पाणी भरून आणलं. ती बाटली पण अशी नामी निवडली होती, की ती जरा दाबली वरच्या झाकणातून पाणी ओघळून खाली पडायचं. त्याचा पहिला प्रसाद अर्थातच अस्मादिकांना मिळाला. त्या बाटलीतनं पाणी ओघळून सरळ माझ्या हाफ़ पॅंटवर पडलं. परत आम्ही खालच्या लोकांनी कलकल केली, तेव्हा त्यने सॉरी वगरे म्हटलं. पण त्याने हाच प्रयोग तातडीने माझ्या बाजूला बसलेल्या कुटुंबावर केला आणि परत आमचा सर्वांचा कलकलाट सहन केला. मात्र त्याने प्रगती करणं सोडलं नाही.

एका स्टेशनवर त्याने पोळी आणि रसाची भाजी विकत घेतली, आणि अपेक्षेप्रमाणे, त्या भाजीचा नमुना , खालच्या मुलीच्या ड्रेसवर शोभून दिसेल असं वाटल्यामुळे की काय कोण जाणे, त्यावर सांडला. त्यावर मात्र तिच्या आईने बरीच आरडाओरड केली. त्यावर त्यानी दिलेलं उत्तर, मी आयुष्यात विसरणार नाही. तो म्हटला, " अहो काही नाही, तो रस उष्टा नाहीये!!!!!!! " म्हणजे तो ड्रेसवर पडलेला रस त्या मुलीने चाखून, तो उष्टा असल्यामुळे एव्हढी आरडाओरड करते आहे, असा बहुधा त्याचा समज झाला असावा.

ह्या सगळ्या प्रकावर, हसता हसता मला कधी पेंग आली ते कळलंच नाही. एकदम पहाटे नागपूर आल्यावर माझ्या बाजूच्याने मला उठवलं, आणि मी सामानासकट स्टेशनवर उतरून, मला घ्यायला आलेल्या माझ्या मित्राला जाऊन भेटलो. त्याला हा सगळा किस्सा कधी एकदा सांगेन असं मला झालं होतं. मी आलो होतो सेकंड क्लासमधून, पण मला आलेला हा अनुभव नक्कीच हिंदी सिनेमातल्या हिरोच्या B.A. डीग्रीसारखा "फर्स्ट क्लास फर्स्ट" होता!!!

Monday, July 02, 2007

खोली

आत्ताच एका मित्राशी चॅट करत होतो. तो म्हणत होता की तो पुण्यात एक भाड्याची खोली शोधतोय. हे शब्द ऎकले अणि एकदम ही कविता सुचली, अगदी spontaeneously!!!!

मला त्या दिवशी एक साधू भेटला-

मी म्हटलं ," काय करता?"

तो म्हणे--"शोध घेतोय खोलीचा"..

मी म्हटलं," येडछापच दिसतोय.."

नंतर भेटला एक मित्र-

तोही म्हणे-"शोध घेतोय खोलीचा"

मी बुचकळ्यात..

नंतर एकदम ट्यूब पेटली

दोघंही खोलीचाच शोध घेत होते-

पहिला मनाच्या आणि दुसरा राहण्याच्या...........

Monday, June 25, 2007

बायको

आमच्या बायकोचं सगळं जरा जास्तीच,

बोलणं तर विचारूच नका-

परवाचीच गोष्ट

वटसावित्रीच्या पूजेला, ही म्हणे

सगळ्या बायकांच्या आधी वडाच्या झाडाला

सूत गुंडाळायला पोचली,

आणि मग दिवसभर जेव्हा घरात बोलायला दुसरा विषयच नव्हता,

तेव्हा मी मनात म्हट्लं-

"हिला काय म्हणावं? तूच माझी वटसावित्री, की-

वटवट सावित्री???????? "

Sunday, June 17, 2007

कोटी..

पोलिसांनाही कोट्या करता येतात

हे मला तेव्हा समजलं-

जेव्हा मी सचिन तेंडुलकरची गाडी चोरून पळून गेल्यावर,

त्यांनी मलाच 'फरारी' घोषित केलं...........

Thursday, March 29, 2007

द्वैत.

सकाळी उठल्यापासून "त्या"ची कटकट सुरू होते.९ वाजता क्लास असतो, म्हणून वास्तविक मी चांगला ८ वाजताचा अलार्म लावून ठेवतो.तो बरोबर ८ला वाजतोही. आणि मला जागही येते.ह्या तिन्ही गोष्टी एकदम घडल्याच्या आनंदात मी उठतो आणि खोलीचं दार उघडतो न उघदतो तोच त्याचा आवाज येतो," काय ९ वाजता क्लास आहे ना? मग आत्तापासून उठून काय दिवे लावणार आहेस घोड्या?झोप परत. ८ला उठतोय लेकाचा." ह्या भीषण भडिमारापुढे मी सपशेल शरणागती देतो आणि निमूटपणे कॉटवर आडवा होतो आणि ८:२० चा अलार्म लावतो. आता तसं पहायला गेलं तर ८:२० आणि ८:३० मधे असा कितीसा फरक आहे म्हणा! त्यामुळे अर्थातच मी ८:२०च्या ऎवजी ८:३० ला दचकून उठतो. डोळ्यासमोर instructor चे भयावह मुद्रा तरळते आणि मी ताड्कन जागा होतो आणि पुन्हा एकदा मगाशी बंद केलेले दार उघडतो. ह्यावेळी मात्र तो काही बोलत नाही. ही त्याची मूक संमती समजून मी आन्हिकं उरकायला लागतो. फक्त दात घासून रात्री घातलेली हाफ पॅंट बदलून त्यातल्या त्यात स्वछ बाहेर घालायची पॅंट घालणे ह्या क्रियेला hostelite विद्यार्थ्यांमधे आन्हिकं असंच म्हणतात. मग मी आणि तो बरोबरच क्लासला जायला निघतो. तेही एकाच सायकलवर.क्लासमधे मात्र तो मला त्रास द्यायला येत नाही.मात्र क्लास सुटला की रावजी हजर!

सतत मजा करणं हा त्याचा स्वभाव. मलाही तो त्याच्याबरोबर ओढून नेतो. मी तरी दर वेळी का त्याच्यामागे जातो कळत नाही.कधी कधी मात्र मी बंड पुकारून त्याच्याबरोबर जायचं नाकारतो. तो चिडतो, धुसफुसतो, आणि रागावून निघून जातो. माझाही नाईलाज असतो. काही महत्वाचा अभ्यास संपवणं अतिशय गरजेचं असतं.गेला तर गेला! येईल झक मारत परत! त्याला माझ्याशिवाय दुसरं आहेच कोण! मी त्याच्यशी दिवसभर बोलत असतो. एखाद्या प्रसंगी कसं वागावं, कसं बोलावं ह्यावर तो मला सारखं सुनावत असतो.मलाही त्याचे लेक्चरबाजी अजिबात कंटाळवाणी वाटत नाही. इतकच काय, मुलींशी कसं बोलावं हेही तच मला शिकवतो!तो काय मुलींशी बोलण्यात expert वगैरे आहे अशातला भाग नाही. पण सारखे सल्ले द्यायची सवय!त्याला कोण काय करणार?

रात्री बिछान्यावर पडल्यावर मात्र आमचा हा दिवसभर चाललेला, मनातला संवाद मी संपवतो. 'तो', म्हणजे माझ्याच मनात दडलेला एक दुसरा 'मी' ,आम्ही दोघंही शांतपणे झोपी जातो, उद्या सकाळच्या ८:०० वाजताच्या अलार्म ची वाट बघत!