Thursday, February 22, 2007

अगम्य भाषेत लिहिणा-यांनो.....

अगम्य भाषेत लिहीणा-यांनो,तुम्हाला माणसांच्या भाषेत का लिहीता येत नाही? आपण असलं काहीतरी आचरटासारखं लिहीलं म्हणजे त्याचं साहित्यीक मूल्य वगैरे वाढेल असं वाटतं की काय तुम्हाला?


साधं उदाहरण घ्या. समजा एखाद्या गोष्टीत असा प्रसंग आहे. एक प्रियकर आणि त्याची प्रेयसी चौपाटीवर उदास नजरेने, सूर्यास्त बघत कसलासा विचार करत बसलेत आणि तो तिला काहीतरी सांगायला जातो. बस्स, प्रसंग एवढाच असतो. आता हे अ.भा.लि.( तेच ते वरचे, अगम्य भाषेत लिहीणारे) लोक त्याचं वर्णन कसं करतात बघा.

सूर्यास्ताची वेळ झाली होती. सूर्याचं पूर्णबिंब हळूहळू पाण्यात बुडायला लागलं होतं. ते मनोहर दृश्य बघताना त्या दोघांच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं( हा "काहूर" शब्द ह्या लोकांना फार आवडतो. जिथे संधी मिळेल तिथे तो लेंडी सारखा टाकत जातात.).कदाचित भविष्याची स्वप्न पडत असतील त्या दोघांना.दूर सागरामधे मच्छीमार परत यायची तयारी करताना दिसत होते(आता वास्तविक ह्याचा काय संबंध आहे?.. पण नाही. सुरू आहे ह्यांची वातावरण निर्मीती.....)सगळा आसमंत त्या समुद्राच्या विशिष्ट वासानी धुंद झाला होता.( कुठल्याही कारणानी ह्यांचा आसमंत धुंद व्हायला वेळ लागत नाही. मग ते समूद्र असो, धुके असो, अत्तर असो वा आणखी काही असो.जणू काही तो धुंद व्हायलाच टपलेला असतो.).त्या धुंद (पुन्हा धुंद!!) वातावरणात त्याने आपला हात तिच्या हाताच्या दिशेने सरकवला. ( हरे राम! अजुन हात पण हातात घेतलेला नाही. हे तर त्या "दामिनी" serial च्या वरताण व्हायला लागलंय!!)अखेरीस त्याने तिचा हात हातात घेतला( हुश्श!!!) व दुस-या हाताने तिचे मुखकमल(??) आपल्याकडे वळवले. तिच्या टपो-या डोळ्यात पाणी तरारलं होतं.( नायिकेचे डोळे टपोरे नसले तर जणू काही यांचे पितर नरकात खितपत पडतील.) . भास्कराचे( इथे सूर्याला काहीतरी भरदार शब्द हवाच!) मावळते प्रतिबिंब त्या अश्रूत दिसत होते. ते बघून तो तिला म्हणाला,".....


हे एवढं वर्णन वाचेपर्यंतच त्या लेखकाला एवढ्या शिव्या मोजाव्याश्या वाटतात की पुढे वा़चायची इच्छा आणि त्राण, दोन्ही संपून जातं.अरे शिंच्या, तो तिला काय म्हटला ते सांग की लवकर. हा आधीचा नसता केरकचरा कशाला? हे असले लिहीणारे धन्य, आणि वाचणारे त्याहून धन्य!!


विहीरीमधे मीठ टाकून तिचे पाणी खारं केलं म्हणजे काय तिचा समूद्र थोडीच बनतो?उलटं त्या विहीरीपाशी येऊन पाणी पिणारे लोकही यायचे बंद होतात.जे काय लिहायचं ते सामान्य माणसाला वाचून कळेल, व पुढे वाचावसं वाटेल, असं लिहावं की. हे नसत्या शब्दांच्या मीठाचे ढिगारे टाकून लेखन खारं कशाला बनवायचं ?

5 comments:

बेधडक said...

मावळते प्रतिबिंब त्या अश्रूत दिसत होते. ते बघून तो तिला म्हणाला,"प्रिये, तुला कितीवेळा सांगू कोलगेट नको, अक्वाफ्रेश वापर. लंचला कांदा खाल्लास, इतकावेळ विचार करत होतो की ही हवा धुंद का आहे, त्या कांद्याचा वास अजून येतोय."

माफ करा राहावलं नाही.

आपला (वात्रट)
बेधडक.

Rahul Deshmukh said...

अहो प्रति शिरिष कणेकर,
फ़टकेबाजी चांगलीच जमून आलीये.

Gayatri said...

:O असे अभागी अभालि अजुनी असतात?
आणि तुला कुठे वाचायला मिळतात रे ते, ऑं?
:)) छानंय लेख.

Anu said...

chhaan ahe likhan.

Anonymous said...

khatarnaak!!