Tuesday, January 16, 2007

प्रतिबिंब....

"आजोबा, गोष्ट सांगा, गोष्ट सांगा.." लंपन आणि त्याच्या दोस्तांनी एकच गिल्ला सुरू केला.आज लंपन पूर्ण फौजच बरोबर घेऊन आला होता. त्याला हे बागेतले आजोबा खूप आवडत.कारण लंपन बागेत आला की रोज ते त्याला एक तरी गोष्ट सांगत.आजोबांनी हसून एकदा सगळ्यांकडे बघितलं, आणि मग गोष्ट सुरू केली. " एका जंगलात, एक राक्षस रहात होता..." . "नाही नाही, ही नको. राक्षसांच्या खूप गोष्टी ऎकल्यात आम्ही. आम्हाला मुलांची गोष्ट ऎकायची आहे." लंपन म्हणाला.
"मुलांची? बरं बाबा. पण तुमच्या पेक्षा थोड्या मोठ्या मुलांची गोष्ट आहे बरं का! कॉलेजातल्या मुलांची गोष्ट आहे ही."
" एकदा काय झालं, एका कॉलेजमधल्या मुलांनी ठरवलं, की एक नाटक करायचं. तुम्ही कसं गॅदरिंगला लहानसं नाटक करता ना, तसंच.आता ही मुलं मोठी. म्हणून त्यांचं नाटकही मोठं.त्या नाटकाचं नाव होतं, " तुझे आहे तुजपशी!!"
आता मुलं जरा कान टवकारून बसली.ही गोष्ट ते पहिल्यांदाच ऎकत होते.
"त्या नाटकात कोण कोण होतं माहितीय? आचार्य होते, काकाजी होते,श्याम, वासूअण्णा,गीता, उषा,जगन्नाथ, भिकू,सतीश ही सगळी मंडळी होती."
मुलं एकमेकांकडे बघायला लागली. त्यांना कळेचना, की ही सगळी मंडळी नक्की कोण ते.लंपननीच मग धीर करून विचारलं, " पण आजोबा,त्यांची खरी नावं काय होती?"
आजोबा स्वतःशीच हसले. " खरी नावं? तुमच्या गोष्टीतल्या राजपुत्रांची खरी नावं काय असतात रे?". लंपन गोंधळला.

आजोबा पुढे म्हटले," आपण आत्ता तरी त्यांना त्यांच्या नाटकातल्या नावानेच बोलावूया. हं, तर ते काकाजी होते ना, ते अगदी थेट तुमच्यासारखे होते.म्हणजे तुमच्यासारखेच मजा करायचे, अधूनमधून दुस-यांना चिडवायचे, आणि स्वतःशीच मस्त हसायचे. त्यांच्या बरोबर विरूद्ध म्हणजे आचार्य. ते होते तुमच्या टीचरांसारखे. सारखे रागवायचे, चिडायचे आणि दुस-यांना आपल्या धाकात ठेवायचे.आयुष्यात कधीही मजा न करता अगदी साधं रहावं, असं सांगायचे.तर हे आचार्य, एकदा काकाजींकडे रहायला आले बरं का! म्हणजे, उषाला, म्हणजे काकाजींच्या पुतणीला ,आचार्यांबद्दल खूप आदर होता, म्हणून तिने त्यांना आपल्या घरी आणलं.झालं! तो श्याम, उषाचा भाऊ, म्हणजे एकदम भोळा बरं का!त्याच्या समोर कुणी काही अधिकारानं बोललं, की लगेच त्याच्या मागे जायचा.साहजिकच श्यामला आचार्यांबद्दल खूप आदर वाटायला लागला.तो अगदी आचार्यांसारखं वागायला लागला.पण तेव्ढ्यात एक गंमत झाली. श्यामचं आणि गीताचं, म्हणजे त्या आचार्यांच्या मानलेल्या मुलीचं, ते सिनेमात हिरो-हिरॉईनचं असतं ना, तस्सं सुरू झालं.आता श्यामला कळेना, की आचार्यांच्या मागे जावं, की गीतेच्या?मग त्याला काकाजींनी समजावलं, " अरे श्याम, तू आता मोठा आहेस, कोणी सांगतं म्हणून नव्हे, तर तुला जे पसंत पडेल तसं वागत जा.तुझं मन त्या गीतेच्या मागे जातंय, आणि तू त्या आचार्यांच्या मागे जातोस?"श्यामला पटलं. शेवटी मग आचार्यांनाही कळलं, की आपण चुकीचं सांगतोय ते.मग त्यांनी श्याम आणि गीताला लग्नाची परवानगी दिली, आणि आपण एकटेच निघून गेले, आपला मार्ग शोधत......"
एवढं बोलून आजोबा थांबले.

"पण आजोबा, ही तर मोठ्या माणसांची गोष्ट आहे. तुम्ही मुलांची गोष्ट सांगणार होतात ना?"

" अरेच्च्या! हो की! विसरलोच होतो! हं, तर त्या मुलांची गोष्ट. त्या सगळ्या मुलांचं एकत्र असण्याचं ते त्या कॉलेजमधलं शेवटचं वर्ष होतं.वर्षभर त्यांनी खूप मजा केली, अनेक गप्पगोष्टी केल्या, आणि वर्ष संपल्यावर निघून गेले सगळे, आपापले मार्ग शोधत...."

" संपली गोष्ट? मग ते सगळे मित्र पुन्हा नाही भेटले आजोबा?"

आजोबा स्वतःशीच हसले. " काय रे, तुम्ही मुलं बागेत खेळायला येता की गोष्टे ऎकायला? चला, पळा खेळायला!" मुलं निघून गेली. काही वेळ आजोबा एकटेच बसून होते. थोड्या वेळानी कानावर हाक आली. "अहो अण्णा अजून इथेच काय बसून राहिलाय? माझी फेरी मारून संपली देखील. चला आता घरी."

त्या कॉलेजमधल्या नाटकात " वासूअण्णा " झालेल्या आजोबांनी, त्यांना हाक मारणा-या, त्याच नाटकातल्या "काकाजीं"कडे वळून बघितलं. बाकावरून उठले, आणि मग ते दोघंही, काठ्या टेकत टेकत, मावळत्या सूर्याकडे पहात, जुन्या आठवणी जागवत, आपापल्या घराची वाट चालू लागले.

(कदाचित बाहेरच्या लोकांना ह्याचा खरा अर्थ समजणार नाही. त्या नाटकात वासूअण्णा मीच झालो होतो. हा लेखात मी भविष्यात घडू शकणारी एक घटना लिहीली आहे. आत्ता माझे वय फक्त २२ वर्षं आहे.)

5 comments:

Shashank Kanade said...

mast shailit lihila aahes.
paN tya mulacha naav Lampan nivadnyamaage kahi hetu?

Shashank Kanade said...

ajoba ajoba,
satish usha, ani shyam geeta cha kaay hota ho nantar?

(ka hi strictly mulanchi goshta aahe?)

Gayatri said...

अण्णा, उत्तम! आहो, पण इतकं हळवं नाही व्हायचं आता या संपर्कक्रांतीवाल्या जगात! बागेत खेळणारी मुलं तर तुम्हांला म्हणतील, "आजोबा, तुमच्या काळात टेलिपोर्टेशन नव्हतं ना, म्हणून तुम्ही नाही भेटू शकायचात एकमेकांना.." आता बोला! :)

Anonymous said...

ekdum kaanajavaLun haat phirvun 'scientific'!

-Charu.

Yogesh said...

अतिशय सुंदर लिहिलं आहे. अहो पण आता ह्या जगात असे आजोबा परत भेटणार कुठं?

असो. तुम्ही मला लिहिलेली प्रतिक्रिया मात्र तितकीशी पटली नाही. पुण्यात लावलेली ही पाटी अतिशय योग्य आहे हे माझे नम्र मत आहे.
आपण http://www.manogat.com/node/2839 या दुव्याचा कृपया लाभ घ्यावा.