Monday, December 25, 2006

शोक

आताच एक मित्र मला म्हटला , की त्याची सख्खी बहीण वारली. ष्टोव्ह्च्या स्फोटात जळून मेली.वाचून सुध्धा अंगावर शहारा येतो ना?मला नाही आला.धक्का बसला एवढं नक्की, पण मन मात्र आधीसारखंच शांत होतं.कसली खळबळ नाही की दुःख नाही.त्याचं सांत्वन सुध्धा करता आलं नाही. असा कसा मी दगड झालो? माझ्या एवढ्या चांगल्या मित्राची बहीण स्फोटात जळून जाते आणि मला काहीच वाटत नाही?

असंच ५-६ वर्षांपुर्वी माझ्या एका शाळेतल्या मित्राचे आई-वडील ट्रेनच्या अपघातात गेले. मी २ दिवस त्याला भेटायला देखील गेलो नाही.अशी असते मैत्री?मनात कायम एक भिती होती, की आपण तिथे गेल्यावर मुर्दाडासारखे बसून राहू, आणि त्याचे सांत्वन करणं तर सोडाच, त्याला आपला तिरस्कार वाटू लागेल.तरी धीर करून मी तिस-या दिवशी त्याच्या घरी गेलो. त्याच्या मोठ्या भावाची अन्नावरची वासनाच उडाली होती. तो सतत एका कोप-यात बसून रडत होता, आणि माझ्या मित्रालाच आपल्या मोठ्या भावाचं सांत्वन करायला लागत होतं.एवढं मी सहन करू शकत होतो, पण जेव्हा मी त्याच्या आजोबांच्या डोळ्यात बघितलं, तेव्हा मात्र मला रडू आवरेना.मी त्याचं सांत्वन करायच्या ऎवजी त्यालाच माझं सांत्वन करायला लागू नये म्हणून मी त्याच्या घराबाहेर पडलो आणि पोटभर रडून घेतलं.त्या दिवशी मी देवाला लाख शिव्या दिल्या असतील, पण मित्राशी धीराचा एक शब्द नाही बोलू शकलो.चांगले पांग फेडले १० वर्षांच्या मैत्रीचे.नंतर खूप वाटलं, पण तेव्हा काहीही करू शकत नव्हतो.

आज माझा मित्रपरिवार ब-यापैकी मोठा आहे. इंजीनायरिंग मधले, इथे IIT मधेही बरेच मित्र आहेत. उद्या मला तशीच गरज भासली तर ही सर्व माझ्या मागे खंबीरपणे उभी रहातील ह्याची मला खात्री आहे.मग अशीच खात्री मी स्वतःच्या बाबतीत का देऊ शकत नाही? आपल्या मित्राशी ज्याला चार सहानुभूतीचे शब्द बोलता येत नाहीत,त्याने कुणाच्या जीवावर "मी तुझ्या पाठी सतत उभा आहे" असं इतरांना सांगावं? माझी मित्रांची निवड अचूक आहे. त्यांची मात्र चुकली आहे.............

Monday, December 04, 2006

अज्ञात प्रियतमे.....

अज्ञात प्रियतमे,
त्या दिवशी तुला शेवडेकरांच्या दुकानात(आमच्या इथे सर्व प्रकारचे किराणा सामान, तसेच उत्तम क्वालिटीच्या पायजम्याच्या नाड्या मिळतील.) हिंग विकत घेताना बघितले.मी समोरच भाजी विकत घेत होतो. आणि माझ्या संपादकांकडून "साभार परत" आलेल्या ३७व्या कथेची शपथ घेउन सांगतो, आयुष्यात पहिल्यांदा मी विकत घेतलेल्या टोमॅटोंमधे एकही किडका निघाला नाही. तेव्हाच मला जाणवलं, की हीच ती! पण हाय रे दुर्दैवा! त्या भाजीवाल्याला नेमका त्याच वेळी हिशेबात गोंधळ घालायचा होता!! ते आटपून वर बघेपर्यंत तू दिसेनाशी झालेली होतीस!
त्यानंतर मी झपाटलेल्या अवस्थेत घरी येउन माझी नवी कथा सुरू केली. काही झालं तरी जित्याची खोड!!महिन्याकाठी एक तरी कथा संपादकाकडून साभार परत आल्याशिवाय मला स्वस्थ झोपच लागत नाही.तसा मी एका शाळेत मराठीचा मास्तर आहे.पण शाळा म्युनिसीपालिटीची असल्यामुळे काम असूनही 'बेकार'च आम्ही.त्यानंतर रोज माझे डोळे तुलाच शोधायचे त्या गल्लीत.तेवढ्यासाठी मी दहादा तरी शेवडेकरांच्या दुकानात( आमच्या इथे... इ.इ...)खेपा घातल्या, आणि नको असतानाही, उगाचच, कोणाला संशय येऊ नये म्हणुन दहादा हिंग विकत घेतलं.दहाव्यांदा हिंग घेतलं तेव्हा तर शेवडेकर माझ्याकडे संशयाने बघायला लागले.शेवट्च्या खेपेला मी धीर करून," त्या दिवशी तुमच्याकडून हिंग घेउन गेली ती कोण?' असं शेवडेकरांना विचारलं देखील.तर त्यावर त्यांनी कुठल्याही पुणेरी दुकानदाराप्रमाणे," आम्ही इथे धंदा करायला बसतो. बायका बघायला नव्हे.." असं अत्यंत उर्मट उत्तर देउन मला वाटेला लावलं.
थोड्या दिवसांनी एका संध्याकाळी तुला एका घरात शिरताना बघितलं, आणि परत एक्दा पु.लं.च्या नाथा कामत प्रमाणे,' महिरून गेलो'. थोडी चौकशी केल्यावर त्या घरात एक अत्यंत तापट रिटायर्ड कर्नल रहातो असं कळलं, त्यामुळे पुढे काही करायला धजावलो नाही.
आता यावरून मी किती हिंमतवाला आहे हे तुला कळलं असेलच. पुढे जे काय झालं, त्यापेक्षा वेगळं दुसरं काय होणार होतं?तुझ्या घरात लग्नाचा मांडव दिसला आणि काय समजायचं ते समजलो.त्या दिवशी जेवढा निराश झालो होतो तेवढा माझी पहिली कथा परत आली तेव्हाही झालो नव्हतो.
तुझं नाव मला कळलं नाही हे माझं नशीबच म्हणायला हवं. अनामिक दु:खं विसरायला सोपी असतात म्हणे.........

तुझा (होऊ इच्छीलेला) प्रियकर.......

Tuesday, October 24, 2006

दुर्योधन

' आज आचार्य द्रोणांनी, आम्हा सर्व राजपुत्रांना गुरूकुलाच्या मोकळ्या मैदानात जमण्यास सांगितले होते.आमचे धनुर्वेदचे पाठ सुरु होते, आणि त्याचीच परिक्षा पहाण्याचा आज दिवस होता. आम्ही सर्व राजपुत्रांनी लक्षभेद आत्मसात केला होता, आणि शब्दवेधाची सुरवात करणार होतो.

आम्ही सर्व त्या मैदानात जमलो.आचार्यांनी बोलायला सुरवात केली," आज मला तुमच्या लक्षभेदाची परिक्षा बघायची आहे.तुम्हाला समोरच्या झाडावर पोपट लटकवलेला दिसतो आहे? त्या पोपटाचा डोळा तुम्हाला भेदायचा आहे. एकेकानी पुढे यायचं, मी विचारलेल्या एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि मग लक्षभेद करावयाचा आहे. युधिष्ठिर, पुढे हो."

युधिष्ठिर आपले धनुष्यबाण सरसावून पुढे झाला. आचार्य म्हटले," नीट त्या पोपटाकडे बघ. सांग तुला काय काय दिसते आहे?" युधिष्ठिर म्हटला," मला ते झाड, त्यावरची फळं, पानं, आणि तो पोपट दिसतो आहे." "थांब. बाण सोडू नकोस. बाजुला जाऊन ऊभा रहा." आश्चर्यचकित युधिष्ठिर बाजुला जाऊन थांबला.आचार्य एकेकाचं नाव घ्यायचे, त्याला तोच प्रश्नं विचारायचे, आणि बाण न सोडता बाजुला ऊभं रहायला सांगायचे. एकट्या कर्णानी आचार्यांना उत्तर दिले," आपण आमचे गुरु आहात. आमची विद्या ही आपण प्रदान केलेली आहे. पण प्रतिभा ही आमची स्वतःची आहे. तुम्ही फक्त आम्हाला लक्ष दाखवून भेद करायला सांगायचं.तो भेद करायचा की नाही हे तुम्ही प्रश्न विचारुन ठरवू शकत नाही. तो माझ्या प्रतिभेचा अपमान आहे. मी लक्षभेद करणार नाही." असं म्हणुन तो बाजुला झाला. असं करत करत आचार्यांनी कोणाही राजपुत्राला बाण मारु दिला नाही.सर्वात शेवटी ऊरला अर्जुन. त्याने मात्र ," मला फक्त पोपटाचा डोळा दिसतो." असे सांगितले. त्यावर आचार्यांनी आनंदानी त्याला बाण मारायची अनुमती दिली आणि अर्थातच त्याने अचुक लक्षभेद केला.

हा सगळ प्रसंग झाल्यावर, दुःशासन माझ्याकडे आला, व म्हटला," पाहिलस दादा, आचार्यांनी पुन्हा एकदा अर्जुनाला आपल्यासमोर ,जाणुनबुजून आपल्यापेक्षा श्रेष्ठ साबित करून दाखवलं."
"म्हणजे?" मी विचारलं. " अरे, तू बघितलं नाहीस का? अर्जुनाला मुद्दाम आचार्यांनी शेवटी बोलावलं. आधीच्या सर्व राजपुत्रांची उत्तरं ऎकून अर्जुनाला, आपण काय उत्तर दिलं पाहिजे, हे आधीच कळलं होतं. त्याची पाळी आल्यावर तो शिकवलेल्या पोपटासारखा बोलला आणि पुन्हा एकदा आचार्यांचा लाडका विद्यार्थी म्हणुन स्वतःचा डंका वाजवून घेतला." '


हा उतारा आहे काका विधाते ह्यांच्या 'दुर्योधन' ह्या पुस्तकातला. जसाच्या तसा नसेल, पण आपल्याला माहित असलेल्या महाभारतातल्या अशा अनेक प्रसंगांकडे बघण्याचा एक वेगळा द्रुष्टिकोन ह्या पुस्तकामधे आहे. चमत्कारांवर जशाच्या तसा विश्वास न ठेवता, त्याच्यामागे खरं काय घडलं असावं ह्याचे अनेक sensible तर्क, ह्या पुस्तकात लेखक करतो. मला खात्री आहे, ह्या प्रसंगाबद्दल आपल्यापैकी कुणीही वरच्यासरखा विचार केलेला नसेल.

द्रौपदी वस्त्रहरणासंबंधी ह्यात दुर्योधन आपल्या पत्नीला म्हणतो," द्रौपदीचं वस्त्रहरण केल्यामुळे लोक दुर्योधनाला, स्त्रीद्वेष्टा,दुष्ट, म्हणुन संबोधत आहेत. हो, मी चुक केली, पण त्याच्यामागचं कारण तरी समजुन घ्या. द्रौपदीचं वस्त्रहरण, ती पांडवपत्नी होती म्हणुन नाही झालं. ते कारण असतं, तर त्या वेळी तिथं इतरही पांडवपत्नी होत्या की. त्यांच्यावरही आम्ही असा प्रसंग आणला असता.द्रौपदी स्त्री होती, म्हणुनही हे घडलं नाही. इतर कोणत्याही स्त्रीशी आम्ही आजर्यंत इतकं असभ्य वर्तन केल्याचे आठवते का आपल्याला? द्रौपदीचं वस्त्रहरण, केवळ ती द्रौपदी होती, म्हणुनच झालं. ही उन्मत्त पांचाली, मयसभेत आमच्यावर फिदीफिदी हसली होती. एवढेच नव्हे, तर तिने तिच्या सख्यांनाही बरोबर आणले होते. मुद्दाम आमच्या अपमानाची मजा बघण्यासाठी. सर्वांसमोर, आमचा 'आंधळ्याचा मुलगा' असं म्हणुन अपमान केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी हे सगळं झालं. तुमचा दुर्योधन कोणी देव अथवा संत नाही राणी, मर्त्य माणुसच आहे.असा सूड घेणं चुकीचं आहे, हे कळतं आम्हाला, पण त्याशिवाय, मनातली आग कशी शांत होणार? कृपा करुन तुमच्या दुर्योधनाला देव्हा-यात बसवू नका. तो माणुस आहे, आणि त्याच्याकडून माणसाच्याच वर्तनाची अपेक्षा करा. "

नीट विचार केला, तर आपल्यालाही लक्षात येईल, की शेवटच्या युद्धात, पांडवांनी कौरवांचे सगळे सेनापती, कपट करूनच मारले.भीष्म, द्रोण, आणि कर्ण, कृष्णाच्या कपटाला बळी पडले.एकाचाही सरळ युद्धात पराभव झाला नाही. शेवटी दुर्योधनालाही कपटानेच मारले. मात्र सबंध युद्धात, कौरवांनी एकदाही कपट केले नाही.

एवढे सगळे वाचल्यावर, तुम्हाला एकदातरी हे पुस्तक वाचावेसे वाटेल अशी आशा करतो.

त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर, दुर्योधनाचा एक संवाद लिहिलेला आहे. तो लिहुन हा लेख संपवतो.

"लोक म्हणतात दुर्योधन लोभी आहे, द्वेष्टा आहे, अहंकारी आहे. हो. मला सामर्थ्याचा लोभ आहे.

कोणच्याही राजाला हा लोभ हवाच.त्याशिवाय तो त्याच्या प्रजेचे काय रक्षण करणार? मला माझ्या शत्रूंचा द्वेष वाटतो. कारण त्यांचा उत्कर्ष हा उद्या माझ्या सर्वनाशाचं कारण ठरू शकतो.

मला ऋषींचा द्वेष नाही, विद्वानांचा तिटकाराही नाही.माझी खरी समस्या ही आहे, की मी माझं राज्य ह्य ऋषी-मुनींच्या सल्ल्याने चालवू शकत नाही,त्यांची राज्यकारभारात ढवळाढवळ सहन करू शकत नाही. ह्या कौरव राज्याचा नियंता, रक्षक, आणि भूपाल आहे मी. कौरव युवराज दुर्योधन आहे मी."








Sunday, October 22, 2006

बिन विषयाचा लेख

ह्या लेखाला विषय नाही.म्हणजे खरं तर हवा.प्रत्येक लेखालाच असतो तो. पण नाही सुचला. पण फारसा फरक पडत नाही. नवसाहित्य म्हणा हवं तर(ह्या नावावर कुठलाही माल खपतो असं ऎकून आहे.).असो.


आता एवढी प्रस्तावना झाल्यावर इतर कुठल्याही लेखात, 'आता आपण मूळ विषयाकडे वळू' अस वाक्य आलं असतं. पण ह्या लेखात ते येऊ शकत नाही.याचं कारण चाणाक्श वाचकांना( म्हणजे सगळ्यांना.. चाणाक्श नसलेला वाचक मला अजुन सापडायचा आहे..) कळलं असेलच. विषय नसलेला लेख फार सरळ असतो. कुठेही वळता येत नाही.कारण वळायचं म्हटलं की विषयांतर होतं, आणि ते इथे वर्ज्य आहे.

ह्या लेखात मी कुठलाच विषय निवडला नाही, त्यावरून मला कुठल्याच विषयात विशेष रूची नाही असे आपल्याला वाटू शकेल.पण तसे नाही.आपल्याला आवडत्या मुलीशी बोलायला गेलं की कसे सगळे विषय आटुन जातात ना, तसं झालय माझं.तिच्यासमोर, "काय कसं काय? मजेत ना?" किंवा "कुठे रहातेस गं तू?" अशा प्रकारचे, म्हणजे, ज्या प्रश्नातुन "हा मुलगा माझ्यावर लाईन मारायचा प्रयत्न करतोय आणि ते त्याला अजिबात जमत नाहीये." हे वाक्य तिला स्पष्ट ऎकू जातं, असेच प्रश्नं सुचतात.मग ती त्यावर काही मोघम उत्तरं देते, आणि मग तिच्याकडे पाहुन, अत्यंत बावळटासारखं हसून आम्ही निघून जातो.अशा वेळी बोलायला कुणी काही विषय दिला तर..... तर पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे, 'मी त्या माणसाचा लकडी पुलावर जाहीर मुका घ्यायला तयार आहे.'


हे थोडं आपल्या (नसलेल्या) विषयाला सोडून झालं नाही का? पण झालं तर होऊ दे की!! इतर लेखात असतं तसं विषयाचं बंधन कुठे आहे ह्या लेखात? स्वतंत्र बाण्याचा लेख म्हणा हवं तर... तसा प्रत्येक लेखालाच स्वतंत्र बाणा असतो म्हणा. पण स्वतंत्र बाण्याचं एवढं काय हो? तो तर अनु मलिकलाही असेल. चाली चोरत असला म्हणुन काय झालं? बाणा तर स्वतंत्र आहे ना? मग आपण त्याला स्वतंत्र बाण्याने चाली चोरणारा, असं म्हणू हवं तर. आपल्याला काय, बाणा महत्वाचा.

बघा! एवढं लिहून झालं तरीही ज्यावर मी लिहावं असा एकही विषय सुचत नाहीये.कसा सुचणार? ज्याच्यावर लिहावं असा एकही चांगला ' विषय ' दिसतच नाहीये डोळ्यासमोर.ते चित्रपटांचे लेखक, कसे एवढाले चित्रपट लिहीतात कुणास ठाऊक!! ते म्हणे कुठे खंडाळा, अमेरिका (ही दोन ठिकाणं एकानंतर एक वाचायला विचित्र वाटताहेत हे कळतय मला, पण तेवढी कल्पनाशक्ती असती, तर एखादा फक्कडसा लेख नसता लिहिला?) अशा ठिकाणी जाऊन ष्टो-या पुर्ण करतात म्हणे.. मी असा जाऊ शकत नाही, म्हणुन तर मी ," अरे, आम्हाला जर अशी संधी मिळाली असती, तर आम्हीही एकामागून एक हिट पिक्चरच्या कथा लिहिल्या असत्या .." हे छातीठोकपणे म्हणू शकतो. एकदा माझ्या चुलत भावाला, त्याच्या लहानपणी त्याची आई म्हटली होती," अरे बघ हा झोपडपट्टीतला मुलगा. रात्रंदिवस अभ्यास करून बोर्डात पहिला आला. तुला आम्ही एवढं देतोय तरी तू अभ्यास करत नाहीस." ह्यावर तो अत्यंत निरागसपणे म्हणला, " मग त्यात काय झालं? आपण जर झोपडपट्टीत रहात असतो, तर मीही पहिला आलो असतो!!".

आता हे सगळं लिहिल्यावर,( म्हणजे, हा लेख बराच ताणल्यावर!)ह्या लेखात मी एक official विषयांतर करतो. दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे, हा लेख पुर्ण वाचायची हिम्मत दाखवल्याबद्दल आपले आभार मानण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे, हा बिन विषयाचा लेख इथंच संपवण्यासाठी!! धन्यवाद!!