आता एवढी प्रस्तावना झाल्यावर इतर कुठल्याही लेखात, 'आता आपण मूळ विषयाकडे वळू' अस वाक्य आलं असतं. पण ह्या लेखात ते येऊ शकत नाही.याचं कारण चाणाक्श वाचकांना( म्हणजे सगळ्यांना.. चाणाक्श नसलेला वाचक मला अजुन सापडायचा आहे..) कळलं असेलच. विषय नसलेला लेख फार सरळ असतो. कुठेही वळता येत नाही.कारण वळायचं म्हटलं की विषयांतर होतं, आणि ते इथे वर्ज्य आहे.
ह्या लेखात मी कुठलाच विषय निवडला नाही, त्यावरून मला कुठल्याच विषयात विशेष रूची नाही असे आपल्याला वाटू शकेल.पण तसे नाही.आपल्याला आवडत्या मुलीशी बोलायला गेलं की कसे सगळे विषय आटुन जातात ना, तसं झालय माझं.तिच्यासमोर, "काय कसं काय? मजेत ना?" किंवा "कुठे रहातेस गं तू?" अशा प्रकारचे, म्हणजे, ज्या प्रश्नातुन "हा मुलगा माझ्यावर लाईन मारायचा प्रयत्न करतोय आणि ते त्याला अजिबात जमत नाहीये." हे वाक्य तिला स्पष्ट ऎकू जातं, असेच प्रश्नं सुचतात.मग ती त्यावर काही मोघम उत्तरं देते, आणि मग तिच्याकडे पाहुन, अत्यंत बावळटासारखं हसून आम्ही निघून जातो.अशा वेळी बोलायला कुणी काही विषय दिला तर..... तर पु.ल. म्हणतात त्याप्रमाणे, 'मी त्या माणसाचा लकडी पुलावर जाहीर मुका घ्यायला तयार आहे.'
हे थोडं आपल्या (नसलेल्या) विषयाला सोडून झालं नाही का? पण झालं तर होऊ दे की!! इतर लेखात असतं तसं विषयाचं बंधन कुठे आहे ह्या लेखात? स्वतंत्र बाण्याचा लेख म्हणा हवं तर... तसा प्रत्येक लेखालाच स्वतंत्र बाणा असतो म्हणा. पण स्वतंत्र बाण्याचं एवढं काय हो? तो तर अनु मलिकलाही असेल. चाली चोरत असला म्हणुन काय झालं? बाणा तर स्वतंत्र आहे ना? मग आपण त्याला स्वतंत्र बाण्याने चाली चोरणारा, असं म्हणू हवं तर. आपल्याला काय, बाणा महत्वाचा.
बघा! एवढं लिहून झालं तरीही ज्यावर मी लिहावं असा एकही विषय सुचत नाहीये.कसा सुचणार? ज्याच्यावर लिहावं असा एकही चांगला ' विषय ' दिसतच नाहीये डोळ्यासमोर.ते चित्रपटांचे लेखक, कसे एवढाले चित्रपट लिहीतात कुणास ठाऊक!! ते म्हणे कुठे खंडाळा, अमेरिका (ही दोन ठिकाणं एकानंतर एक वाचायला विचित्र वाटताहेत हे कळतय मला, पण तेवढी कल्पनाशक्ती असती, तर एखादा फक्कडसा लेख नसता लिहिला?) अशा ठिकाणी जाऊन ष्टो-या पुर्ण करतात म्हणे.. मी असा जाऊ शकत नाही, म्हणुन तर मी ," अरे, आम्हाला जर अशी संधी मिळाली असती, तर आम्हीही एकामागून एक हिट पिक्चरच्या कथा लिहिल्या असत्या .." हे छातीठोकपणे म्हणू शकतो. एकदा माझ्या चुलत भावाला, त्याच्या लहानपणी त्याची आई म्हटली होती," अरे बघ हा झोपडपट्टीतला मुलगा. रात्रंदिवस अभ्यास करून बोर्डात पहिला आला. तुला आम्ही एवढं देतोय तरी तू अभ्यास करत नाहीस." ह्यावर तो अत्यंत निरागसपणे म्हणला, " मग त्यात काय झालं? आपण जर झोपडपट्टीत रहात असतो, तर मीही पहिला आलो असतो!!".
आता हे सगळं लिहिल्यावर,( म्हणजे, हा लेख बराच ताणल्यावर!)ह्या लेखात मी एक official विषयांतर करतो. दोन गोष्टींसाठी. एक म्हणजे, हा लेख पुर्ण वाचायची हिम्मत दाखवल्याबद्दल आपले आभार मानण्यासाठी, आणि दुसरं म्हणजे, हा बिन विषयाचा लेख इथंच संपवण्यासाठी!! धन्यवाद!!
2 comments:
prasad chafekaranan sa.na.vi.vi(ha vishay nahi)
sahi lihila hes.ha tuzha pailu mala mahiti navta.ya veles me nakshtranche denechye kahi part anale ahet.me me if possible ani mala hasva fasvi lavkar de.
baaki bin vishayache kahi bol
yogesh
don ahes ka re tu??
;-)
awadla...
-AB
Post a Comment