अज्ञात प्रियतमे,
त्या दिवशी तुला शेवडेकरांच्या दुकानात(आमच्या इथे सर्व प्रकारचे किराणा सामान, तसेच उत्तम क्वालिटीच्या पायजम्याच्या नाड्या मिळतील.) हिंग विकत घेताना बघितले.मी समोरच भाजी विकत घेत होतो. आणि माझ्या संपादकांकडून "साभार परत" आलेल्या ३७व्या कथेची शपथ घेउन सांगतो, आयुष्यात पहिल्यांदा मी विकत घेतलेल्या टोमॅटोंमधे एकही किडका निघाला नाही. तेव्हाच मला जाणवलं, की हीच ती! पण हाय रे दुर्दैवा! त्या भाजीवाल्याला नेमका त्याच वेळी हिशेबात गोंधळ घालायचा होता!! ते आटपून वर बघेपर्यंत तू दिसेनाशी झालेली होतीस!
त्यानंतर मी झपाटलेल्या अवस्थेत घरी येउन माझी नवी कथा सुरू केली. काही झालं तरी जित्याची खोड!!महिन्याकाठी एक तरी कथा संपादकाकडून साभार परत आल्याशिवाय मला स्वस्थ झोपच लागत नाही.तसा मी एका शाळेत मराठीचा मास्तर आहे.पण शाळा म्युनिसीपालिटीची असल्यामुळे काम असूनही 'बेकार'च आम्ही.त्यानंतर रोज माझे डोळे तुलाच शोधायचे त्या गल्लीत.तेवढ्यासाठी मी दहादा तरी शेवडेकरांच्या दुकानात( आमच्या इथे... इ.इ...)खेपा घातल्या, आणि नको असतानाही, उगाचच, कोणाला संशय येऊ नये म्हणुन दहादा हिंग विकत घेतलं.दहाव्यांदा हिंग घेतलं तेव्हा तर शेवडेकर माझ्याकडे संशयाने बघायला लागले.शेवट्च्या खेपेला मी धीर करून," त्या दिवशी तुमच्याकडून हिंग घेउन गेली ती कोण?' असं शेवडेकरांना विचारलं देखील.तर त्यावर त्यांनी कुठल्याही पुणेरी दुकानदाराप्रमाणे," आम्ही इथे धंदा करायला बसतो. बायका बघायला नव्हे.." असं अत्यंत उर्मट उत्तर देउन मला वाटेला लावलं.
थोड्या दिवसांनी एका संध्याकाळी तुला एका घरात शिरताना बघितलं, आणि परत एक्दा पु.लं.च्या नाथा कामत प्रमाणे,' महिरून गेलो'. थोडी चौकशी केल्यावर त्या घरात एक अत्यंत तापट रिटायर्ड कर्नल रहातो असं कळलं, त्यामुळे पुढे काही करायला धजावलो नाही.
आता यावरून मी किती हिंमतवाला आहे हे तुला कळलं असेलच. पुढे जे काय झालं, त्यापेक्षा वेगळं दुसरं काय होणार होतं?तुझ्या घरात लग्नाचा मांडव दिसला आणि काय समजायचं ते समजलो.त्या दिवशी जेवढा निराश झालो होतो तेवढा माझी पहिली कथा परत आली तेव्हाही झालो नव्हतो.
तुझं नाव मला कळलं नाही हे माझं नशीबच म्हणायला हवं. अनामिक दु:खं विसरायला सोपी असतात म्हणे.........
तुझा (होऊ इच्छीलेला) प्रियकर.......
Monday, December 04, 2006
Subscribe to:
Post Comments (Atom)
2 comments:
:))
-saksham
हे देखील आवडलं
Post a Comment