Thursday, May 26, 2011

एक जनरल प्रॉबलेम...

मी उद्या तुला भेटणार,
सगळं सांगायचं ठरवणार,
फोन लावायला जाणार,
नंबर दाबताना हात थरथरणार,
न लावताच मग कट करणार,
श्या! हे सगळं मला कसं जमणार?

शेवटी धीर करून नंबर लावणार,
तू पण नेमका दहादा रिंग वाजल्यानंतरच उचलणार,
तोपर्यंत माझे बी.पी वर खाली होणार,
शेवटी तुझा आवाज ऎकू येणार,
घशातला श्वास घशातच अडकणार,
काही न बोलताच मग फोन ठेऊन देणार,
श्या! हे सगळं मला कसं जमणार?

शेवटी फोनचा नादच सोडून देणार,
सरळ तुला facebook वर message करणार,
अमुक वेळी तमुक जागी तुला भेटायला बोलावणार,
'send' वर click करण्याआधी दहादा बाथरूमला जाणार,
"साल्या एवढा कशाला घाबरतोस रे?" असं मीच माझ्यावर चिडणार,
श्या! हे सगळं मला कसं जमणार?

मग तुझ्या replyची वाट बघत बसणार,
मिनिटाला शंभरदा facebook चेक करणार,
"अजून कसा येत नाही?" असं स्वतःवर चरफडणार,
शेवती वैतागून computer बंद करणार,
५ मिनिटात झक मारत चालू करणार,
शेकडो तासांनंतर तुझ reply येणार,
तू पण नुसतं "हो, येते की", एवढंच लिहीणार,
" तिला काय वाटलं असेल?" म्हणून मी उगाचच अस्वस्थ होणार,
श्या! हे सगळं मला कसं जमणार?

मग त्या दिवशी मी तयार वगैरे होणार,
कधी नव्हे ती दाढी करणार,
"ठेवणीतले" कपडे बाहेर काढणार,
मग तिथे पोचणार, वाट बघणार,
तू दिसताच परत धडधड सुरू होणार,
पुढच्या कल्पनेने घाम फुटणार,
रुमाल पण नेमका घरी विसरणार,
श्या! हे सगळं मला कसं जमणार?

मग तू येणार,
आपण बोलायला लागणार,
मी मुख्य सोडून सगळे विषय काढणार,
शेवटी तू निघायची वेळ होणार,
मग मात्र मी हिंमत करणार,
तुला सगळं सांगून टाकणार,
मग श्वास रोखून धरणार,
च्यायला नेमकी तेव्हाच मला घाईची लागणार,
श्या! हे सगळं मला कसं जमणार?

मग तू भाव खाऊन घेणार,
२-३ दिवसांनंतर "हो" म्हणणार,
मग आपण "कपल" की काय ते होणार,
मग तुला शॉपिंगला न्यावं लागणार,
शॉपिंग करून थकल्यामुळे खायला घालावं लागणार,
तुझ्या सगळ्या नातेवाईकांचे वाढदिवस लक्षात ठेवायला लागणार,
तू घरी आलीस की माझी खोली आवरावी लागणार,
दिवसातून एक-दोनदा फोन करून रिपोर्टिंग करावं लागणार,
मित्रांना भेटणं अवघड होऊन बसणार,
थोडक्यात काय, माझ्यातला "मी" संपून "तू" सुरू होणार,
श्या! हे सगळं मला कसं जमणार?

त्यापेक्षा, तुला न सांगितलेलंच बरं.... :)

9 comments:

हेरंब said...

हाहाहा.. जबरदस्त आहे हे.. शेवट अल्टी..

Suhas Diwakar Zele said...

प्रचंड भारी....खुप आवडली
असं लिहायला मला कधी जमणार ;-)

Yogesh said...

प्रचंड भारी.खुप आवडली!!!

सिद्धार्थ said...

>> त्यापेक्षा, तुला न सांगितलेलंच बरं.... :)
जबरी...

Deepak Parulekar said...

हा हा हा !
पहिलं लिहायचं ना भाउ, आम्ही बोलून मोकळे झालो आणि आता भोगतोय !

प्रचंड ! :):):)

Nivedita Raj said...

प्रचंड भारी....खुप आवडली

पियू परी :) said...

मस्त.. खूप आवडली....

साधक said...

मस्तच. शेवटची ओळ भारीच.

THEPROPHET said...

जबरदस्त! :D