Sunday, January 02, 2011

असल्या आयडीयाची कल्पना न केलेलीच बरी

कालच सचिन-अशोक सराफ-महेश कोठरेंचा "आयडीयाची कल्पना" ह सिनेमा पाहिला. "अशी ही बनवाबनवी"च्या दिग्दर्शकाकडून ही अपेक्षा नव्हती. आता प्रत्येक पिक्चर तेवढा चांगला होऊ शकत नाही हे माहित आहे मला, पण शेवटी काही किमान क्वालिटीची अपेक्षा करतोच ना!
मुळात ह्या सिनेमाची पटकथा खूपच ढिसाळ आहे. सचिन पिळ्गावकरसारखा दिसणारा एक होतकरू कलाकार जयराम ह्याला पोलिस कमिशनर महेश ठाकूर (महेश कोठारे) ह्यांच्या गाडीची धडक बसून तो थोडा वेळ बेशुद्ध होतो. गाडी कमिशनरची बहिण (भार्गवी चिर्मुले) चालवत असते. पण ती अपघात झाल्यावर तिथून पळून जाते. अपघात खरं तर किरकोळ असतो, पण जयरामचा धूर्त मेव्ह्णा वकील मनोहर बार्रशिंगे (अशोक सराफ) अपघाताकडे पैसे कमावण्याची संधी म्हणून बघायला लागतो. त्यातच त्याला, जयरामला लहानपणीच्या एका अपघातामुळे compressed vertebra झाला आहे असं कळतं. मग तो जयरामला अपंग झाल्याचे नाटक करायला सांगतो, ज्यायोगे कमिशनर बरोबर out-of-court settlement करता येईल. त्यातच जयरामचं कमिशनरच्या बहिणीवर प्रेम बसतं, व ह्या कहाणीमधे अजून थोडासा गोंधळ होतो.

आता पुढे नेमकं काय होतं, मनोहरला पैसी मिळतात का, जयरामला त्याचं प्रेम मिळतं का, हे सगळं कळण्यासाठी सिनेमा पहा. अगदीच दुसरं काही करायला नसेल तर.

ह्या सिनेमात सचिनने मनमोहन देसाईंच्या फ़िल्म मधे असायचे तसे योगायोग, बिछडे हुए जुडवे भाई, वगैरे असलाही मसाला घातला आहे. जयराम ज्या हॉस्पीटल्मधे अ‍ॅडमिट असतो, त्याचं नाव सुद्धा "मनमोहन देसाई जनरल हॉस्पीटल" असं असतं. एवढी तगडी स्टारकास्ट आणि गुंतागुंतीची कथा असूनसुद्धा हा सिनेमा कधीच पकड घेत नाही. कारण ह्या सिनेमात खूप मोठे दोष आहेत. पहिला म्हणजे ह्या सिनेमात खूप आचरटपणा आहे, पण तरीही शहाणपणाचा उगाच आव आणला जातोय असं वाटतं. जर आचरटच सिनेमा काढायचा होता, तर त्यात असला आव अजिबात कामाचा नाही. उदाहरणार्थ, "खिचडी-द मूव्ही" हा सिनेमा पहा. मूर्तीमंत आचरट! पण तरीही हा सिनेमा आवडू शकतो, कारण तो शहाणपणाचा कधी जरासुद्धा आव आणत नाही. सगळी पात्र सगळा वेळ कायम आचरटपणाच करत असतात. ते खपून जातं, कारण प्रेक्षकांची तीच अपेक्षा बनून जाते.

sensible सिनेमात सुद्धा आचरटपण दाखवता येतो, नाही असं नाही. पण त्यासाठी प्लॉट खूपच सशक्त लागतो. "जाने भी दो यारों" मधला नसिरुद्दीन शहा आणि सतिश कौशिक मधला फोनवरचा संवाद आठवा. किंवा त्याच सिनेमातला क्लायमॅक्स मधला महाभारताच्या नाटकाचा सीन आठवा. हे सीन जरी आचरट कॉमेडी मधे मोडत असले, तरीही सिनेमात इतके सहज येतात की ते ऑड वाटत नाही. ह्या सिनेमात मात्र आचरटपणा सिनेमाभर विखूरला गेला आहे, आणि त्यामुळे एखाद्या प्रसंगाची मजा येत असतानाच तो मधेच संपतो, आणि त्यामुळे सिनेमाभर सतत अर्धवट करमणूकीची भावना येत रहाते.

ह्या सिनेमात चीड आणणारी गोष्ट म्हणजे सिनेमातल्या प्रॉडक्ट्सच्या जाहीराती. कुठलतरी मच्छर मारायची कॉईल, लागू बंधू, ब्रूक बॉंड चहा अशा अनेक प्रॉडक्ट्स ची ह्यात जाहिरातबाजी आहे. बरं, नुसती कथेच्या ओघात ही उत्पादनं दाखवली असती तर काही वांधा नव्हता. ह्या प्रत्येक उत्पादनासाठी स्वतंत्र प्रसंग योजला आहे, ही खरी चीड आणणारी गोष्टं आहे. त्यामुळे "प्रेक्षकांचा रसभंग झाला" ही understatement होईल. सचिन त्यांच्या प्रेक्षकांना गृहीत धरायला लागलेत असं वाटायला लागलंय मला. आपण काहीही कचरा तयार केला तरी प्रेक्षक बघतील असं वाटलं की काय त्यांना? तसं असेल तर "आम्ही सातपूते" वरून ते काही शिकले नाही असंच म्हणायला लागेल .
अभिनयाच्या बाबतीत मात्र बोलायला खूप कमी जागा आहे. सर्वच कलाकारांनी मनापासून काम केलं आहे. अशोक सराफ ह्यांच्या टायमिंगची अजून किती चर्चा करणार? संधी मिळताच ते प्रेक्षकांकडून हुकमी हशे वसूल करू शकतात. महेश कोठारे आणि सचिन ने सुद्धा आपापल्या भूमिका उत्तम वठवल्या आहेत. भार्गवी चिर्मुले दिसते छान आणि डान्सही छान करते. सचिन मात्र आता अविवाहित तरूण साकारायच्या वयाच्या पुढे गेले आहेत हे त्यांनी ओळखावं.


एकूण सांगायचं तर,अगदीच वेळ जात नसेल, सगळे मित्र-मैत्रिणी बाहेरगावी गेले असतील, कुठ्लंच काम हाताशी नसेल, सेल फोनवरचा बॅलन्स संपल्यामुळे कोणाशी बोलता येत नसेल, तर हा सिनेमा आवर्जून पहा. कारण तो पाहिल्यावर घरी बसणंच जास्त चांगलं होतं असं तुम्हाला वाटायला लागेल, आणि घरी जायच्या (आयडीयाच्या) कल्पनेने तुम्हाला आपोआप उत्साह येईल..

2 comments:

Spruha said...

Mulat tu to pahilasach ka?????!!!;-);-);-)

Prasad Chaphekar said...

ata na paahta waeeT aahe asa kasa Tharvaaycha? tyatun parikshaN changla aala hota.. he paperwale kaay daru piun picture pahtaat kaay kuNaas Thauk!!