आम्ही सर्व त्या मैदानात जमलो.आचार्यांनी बोलायला सुरवात केली," आज मला तुमच्या लक्षभेदाची परिक्षा बघायची आहे.तुम्हाला समोरच्या झाडावर पोपट लटकवलेला दिसतो आहे? त्या पोपटाचा डोळा तुम्हाला भेदायचा आहे. एकेकानी पुढे यायचं, मी विचारलेल्या एक प्रश्नाचं उत्तर द्यायचं आणि मग लक्षभेद करावयाचा आहे. युधिष्ठिर, पुढे हो."
युधिष्ठिर आपले धनुष्यबाण सरसावून पुढे झाला. आचार्य म्हटले," नीट त्या पोपटाकडे बघ. सांग तुला काय काय दिसते आहे?" युधिष्ठिर म्हटला," मला ते झाड, त्यावरची फळं, पानं, आणि तो पोपट दिसतो आहे." "थांब. बाण सोडू नकोस. बाजुला जाऊन ऊभा रहा." आश्चर्यचकित युधिष्ठिर बाजुला जाऊन थांबला.आचार्य एकेकाचं नाव घ्यायचे, त्याला तोच प्रश्नं विचारायचे, आणि बाण न सोडता बाजुला ऊभं रहायला सांगायचे. एकट्या कर्णानी आचार्यांना उत्तर दिले," आपण आमचे गुरु आहात. आमची विद्या ही आपण प्रदान केलेली आहे. पण प्रतिभा ही आमची स्वतःची आहे. तुम्ही फक्त आम्हाला लक्ष दाखवून भेद करायला सांगायचं.तो भेद करायचा की नाही हे तुम्ही प्रश्न विचारुन ठरवू शकत नाही. तो माझ्या प्रतिभेचा अपमान आहे. मी लक्षभेद करणार नाही." असं म्हणुन तो बाजुला झाला. असं करत करत आचार्यांनी कोणाही राजपुत्राला बाण मारु दिला नाही.सर्वात शेवटी ऊरला अर्जुन. त्याने मात्र ," मला फक्त पोपटाचा डोळा दिसतो." असे सांगितले. त्यावर आचार्यांनी आनंदानी त्याला बाण मारायची अनुमती दिली आणि अर्थातच त्याने अचुक लक्षभेद केला.
हा सगळ प्रसंग झाल्यावर, दुःशासन माझ्याकडे आला, व म्हटला," पाहिलस दादा, आचार्यांनी पुन्हा एकदा अर्जुनाला आपल्यासमोर ,जाणुनबुजून आपल्यापेक्षा श्रेष्ठ साबित करून दाखवलं."
"म्हणजे?" मी विचारलं. " अरे, तू बघितलं नाहीस का? अर्जुनाला मुद्दाम आचार्यांनी शेवटी बोलावलं. आधीच्या सर्व राजपुत्रांची उत्तरं ऎकून अर्जुनाला, आपण काय उत्तर दिलं पाहिजे, हे आधीच कळलं होतं. त्याची पाळी आल्यावर तो शिकवलेल्या पोपटासारखा बोलला आणि पुन्हा एकदा आचार्यांचा लाडका विद्यार्थी म्हणुन स्वतःचा डंका वाजवून घेतला." '
हा उतारा आहे काका विधाते ह्यांच्या 'दुर्योधन' ह्या पुस्तकातला. जसाच्या तसा नसेल, पण आपल्याला माहित असलेल्या महाभारतातल्या अशा अनेक प्रसंगांकडे बघण्याचा एक वेगळा द्रुष्टिकोन ह्या पुस्तकामधे आहे. चमत्कारांवर जशाच्या तसा विश्वास न ठेवता, त्याच्यामागे खरं काय घडलं असावं ह्याचे अनेक sensible तर्क, ह्या पुस्तकात लेखक करतो. मला खात्री आहे, ह्या प्रसंगाबद्दल आपल्यापैकी कुणीही वरच्यासरखा विचार केलेला नसेल.
द्रौपदी वस्त्रहरणासंबंधी ह्यात दुर्योधन आपल्या पत्नीला म्हणतो," द्रौपदीचं वस्त्रहरण केल्यामुळे लोक दुर्योधनाला, स्त्रीद्वेष्टा,दुष्ट, म्हणुन संबोधत आहेत. हो, मी चुक केली, पण त्याच्यामागचं कारण तरी समजुन घ्या. द्रौपदीचं वस्त्रहरण, ती पांडवपत्नी होती म्हणुन नाही झालं. ते कारण असतं, तर त्या वेळी तिथं इतरही पांडवपत्नी होत्या की. त्यांच्यावरही आम्ही असा प्रसंग आणला असता.द्रौपदी स्त्री होती, म्हणुनही हे घडलं नाही. इतर कोणत्याही स्त्रीशी आम्ही आजर्यंत इतकं असभ्य वर्तन केल्याचे आठवते का आपल्याला? द्रौपदीचं वस्त्रहरण, केवळ ती द्रौपदी होती, म्हणुनच झालं. ही उन्मत्त पांचाली, मयसभेत आमच्यावर फिदीफिदी हसली होती. एवढेच नव्हे, तर तिने तिच्या सख्यांनाही बरोबर आणले होते. मुद्दाम आमच्या अपमानाची मजा बघण्यासाठी. सर्वांसमोर, आमचा 'आंधळ्याचा मुलगा' असं म्हणुन अपमान केला होता. त्याचा सूड घेण्यासाठी हे सगळं झालं. तुमचा दुर्योधन कोणी देव अथवा संत नाही राणी, मर्त्य माणुसच आहे.असा सूड घेणं चुकीचं आहे, हे कळतं आम्हाला, पण त्याशिवाय, मनातली आग कशी शांत होणार? कृपा करुन तुमच्या दुर्योधनाला देव्हा-यात बसवू नका. तो माणुस आहे, आणि त्याच्याकडून माणसाच्याच वर्तनाची अपेक्षा करा. "
नीट विचार केला, तर आपल्यालाही लक्षात येईल, की शेवटच्या युद्धात, पांडवांनी कौरवांचे सगळे सेनापती, कपट करूनच मारले.भीष्म, द्रोण, आणि कर्ण, कृष्णाच्या कपटाला बळी पडले.एकाचाही सरळ युद्धात पराभव झाला नाही. शेवटी दुर्योधनालाही कपटानेच मारले. मात्र सबंध युद्धात, कौरवांनी एकदाही कपट केले नाही.
एवढे सगळे वाचल्यावर, तुम्हाला एकदातरी हे पुस्तक वाचावेसे वाटेल अशी आशा करतो.
त्या पुस्तकाच्या शेवटच्या पानावर, दुर्योधनाचा एक संवाद लिहिलेला आहे. तो लिहुन हा लेख संपवतो.
"लोक म्हणतात दुर्योधन लोभी आहे, द्वेष्टा आहे, अहंकारी आहे. हो. मला सामर्थ्याचा लोभ आहे.
कोणच्याही राजाला हा लोभ हवाच.त्याशिवाय तो त्याच्या प्रजेचे काय रक्षण करणार? मला माझ्या शत्रूंचा द्वेष वाटतो. कारण त्यांचा उत्कर्ष हा उद्या माझ्या सर्वनाशाचं कारण ठरू शकतो.
मला ऋषींचा द्वेष नाही, विद्वानांचा तिटकाराही नाही.माझी खरी समस्या ही आहे, की मी माझं राज्य ह्य ऋषी-मुनींच्या सल्ल्याने चालवू शकत नाही,त्यांची राज्यकारभारात ढवळाढवळ सहन करू शकत नाही. ह्या कौरव राज्याचा नियंता, रक्षक, आणि भूपाल आहे मी. कौरव युवराज दुर्योधन आहे मी."