माझ्या खूप सा-या मित्र-मैत्रिणिंना कवितेतलं खूप सारं कळतं (निदान माझ्यापेक्षा जास्ती कळतं एवढं तरी मलाकळलेलं आहे.) उदा. गायत्री, राहुल, प्रसाद,स्पृहा, मंदार वगैरे. ही मंडळी कवितांचे खो-खो वगैरे खेळतात. आता म्हणजे काय हे विचारू नका. त्यासाठी वेगळा ब्लॉग लिहावा लागेल. ते जे असेल ते असो. त्यामुळे ह्यांचे ब्लॉग वाचताना मला खूप insecure होतं. कारण मला कविता समजायला, यमक जुळलेलं असावं ही पहिली अट असते. आणि हे मारे वेगवेगळ्या निबंधात्मक कवितांची रसग्रहणं लिहीत असतात.
म्हणून आज हा माझा पहिला रसग्रहणाचा प्रयत्न आहे. पाचकळ आहे हे आधीच सांगून ठेवतो, तेव्हा वाचून हा लेख टराटरा फाडावासा वाटल्यास आमची जबाबदारी नाही. तर माझ्या पहिल्या रसग्रहणासाठी मी गोविंदा आजोबांचं एक गाणं निवडलं आहे.
"मैं तो रस्ते से जा रहा था" ह्या गाण्याचे शब्द वाचताना मला त्यात दडलेला खोल अर्थ जाणवला आणि म्हणून हा प्रयत्न (पाचकळपणा ऑलरेडी सुरू झाला आहे हे चाणाक्ष वाचकांनी ओळखलं असेलच)
" मैं तो रस्ते से जा रहा था
मैं तो भेलपूरी खा रहा था
मैं तो लडकी घुमा रहा था"-(२)
ह्या शब्दातून एका सामान्य चाकरमान्या वर्गातील होतकरू तरूणाचं वर्णन कवी करत आहे. तरूण बहधा कॉल-सेंटर (किंवा सॉफ्टवेअर कंपनी) मधे कामाला असल्यामुळे नीट जेवायला त्याला वेळ होत नाही व रस्त्यावरच्या भेळपूरी वर त्याला गुजराण करावी लागत आहे. तरी पण तरूण हे सगळं हसत-मुखाने सहन करतआहे, कारण त्यची गर्लफ्रेंड त्याच्या सोबत आहे. ह्या ओळीवरून कवी आपल्याला प्रेमाची महती सांगत आहे, की प्रेम असेल तर घरात कीचनची गरज नसते.
"तुझको मिर्ची लगी तो मैं क्या करू"-(२)
ह्या ओळीतून कवी दाखवून देतो आहे की गर्लफ्रेंडला मिर्ची लागल्यामुळे तरूण सैरभैर होऊन उपाय शोधत आहे. पण त्याला उपाय सापडत नाहीये. वास्तविक ह्यातली "मिर्ची" हे भ्रष्टाचाराचं प्रतीक असून सामान्य माणूस त्याच्यापुढे काहीच करू शकत नाही असं कवीला सांगायचं आहे. पण संगीतकाराने चुकीच्या शब्दावर जोरदिल्यामुळे तरूणाला त्याच्या "सामाना"ची काहीच फिकीर नाही, असा अत्यंत चुकीचा अर्थ आपल्या समोर येतो.
"मै तो रस्ते से जा रही थी,
मैं तो आई-स्क्रीम खा रही थी
मैं तो नैना लडा रही थी"-(२)
ह्या ओळीतून त्या प्रयसीची आपल्याला ओळख होते. ती एक अल्लड तरूणी असल्याची भावना मनात तयार होते. तिच्या प्रियकराबरोबर हिंडत, आजुबाजुची शोभा पहात आई-स्क्रीम खात आनंदाने चालली आहे. मध्यमवर्गीय संथ जीवनाचे प्रतीक म्हणून कवीला ही मुलगी उभी करायची आहे. (आता आई-स्क्रीम खात असताना हिला मिर्ची कशी लागली असा प्रश्न अजाण वाचकांच्या मनात येणं साहजिक आहे. आला असेल तर येऊ द्या. असल्या फाल्तू प्रश्नांची उत्तरं रसग्रहणात मिळत नसतात. इथे आम्ही गर्भित अर्थ शोधत असतो.)
"जले चाहे सारा जमाना,
चाहे तुझे तेरा दिवाना"-(२)
"संग तेरे मैं भाग जाऊँ,
नजर किसी को भी ना आऊँ"
"लोग दिलवालों से यार जलते हैं,
कैंसे बताऊँ क्या क्या चाल चलते हैं"
ह्या हृदयद्रावक कडव्यातून तरूण आता संघर्षाला तयार झाला आहे अशी उत्साहाची भावना मनात तयार व्हायला मदत होते. जिकडे तिकडे विरोध सहन करावा लागत आहे हे तर उघड आहे. थोडक्यात सांगायचं, तर हीरो त्याला विरोध करणा-यांना "तुमच्या नानाची टांग" असे सांगत आहे
"मैं तो गाडी से जा रहा था,
मैं तो सीटी बजा रहा था
मैं तो टोपी फिरा रहा था
तुझको धक्का लगा तो मैं क्या करूँ"
ह्या कडव्यातून कवी अत्यंत हुशारीने तो हीरो मुळचा पुण्याचा असल्याची जाणीव करून देतो. गाडीने जात असताना ड्रायव्हींग सोडून सगळं काही करत असणारा माणूस पुण्याचाच असू शकतो. असं असताना हीरॉईनला धक्का लागणं साहजिक आहे आणि तिने अधिक खबरदारी घ्यायला हवी होती ह्याची हीरो अत्यंत नम्र शब्दात तिला जाणीव करून देतो. कदाचित हे त्यांच्या पहिल्या भेटीचा प्रसंगाचं वर्णन असू शकेल आणि त्यावेळच्या घटनांचं कवी हळुवारपणे वर्णन करतो.
"नई कोई पिक्चर दिखादे,
मुझे कहीं खाना खिलादे."
"जरा निगाहों से पिलादे,
प्यास मेरे दिल की बुझा दे"
ह्यातल्या पहिल्या दोन ओळीतून कवी वाढती महगाई व त्यात सतत वाढणा-या मागण्या ह्याचे भीषण वर्णन करत आहे. तर दुस-या दोन ओळीत, मध्यमवर्गीय माणूस हळूच विषय बदलून ह्या मागण्यातून आपली कशी सुटका करून घेतो ह्याचे गमतीशीर चित्र आपल्याला पहायला मिळते. एकाच कडव्यात भयानक समस्या व त्यावरचा सोप्पा उपाय सांगून कवी आपल्या अत्युच्च प्रतिभेची जाणीव करून देतो.
"आज तुझे जी भरके प्यार करना हैं"
"तेरी निगाहों से दीदार करना हैं"
ह्या ओळी चावट असल्यामुळे ह्यांचे रसग्रहण आम्ही चारचौघात करू शकत नाही. क्षमस्व.
"मैं तो ठुमका लगा रही थी
मैं तो गीत कोई गा रही थी
मैं तो चक्कर चला रही थी"-(२)
"तेरी नानी मरी तो मैं क्या करूँ"-(२)
ह्या कडव्यात कवीने जेव्हा हीरो आपल्या हिरविणीला आपल्या आज्जीला दाखवायला घेऊन जातो तेव्हाचं वर्णन केलं आहे. आज्जीने कौतुकाने मुलीला, "तुला काय काय येतं बाळ?" असं विचारल्यावर हिरविण आपल्या अंगभूत कलांचं प्रदर्शन मांडायला सुरवात करते. ते विश्वरूप दर्शन सहन न झाल्याने आज्जी तडक देवाघरी जाते असा हा करूण प्रसंग कवीने हुबेहूब चितारला आहे. ह्या प्रसंगातून हिरविण पुरोगामी असल्याचे समजते तर तिच्या कला सहन न होणारी आज्जी प्रतिगामी असल्याचे समजते. अशा रितीने त्या दोघांच्या मिलनातला अडथळा आपोआप देवाघरी गेल्याने हीरो-हिरविण आनंदाने नांदू लागले! अशा अत्यंत समर्पक प्रसंगावर कवी ह्या अतुलनीय काव्याचा शेवट करतो...
(गोविंदाच्या अभंगांच्या रसग्रहणाचे पुस्तकच छापावे असे आमच्या मनात आहे. ते वाचकांच्या प्रतिसादावर अवलंबून आहे. वास्तविक विं.दा. करंदीकर ह्यांच्या कविता आणि ही असली गाणी, ह्या वर
"विंदा आणि गोविंदा- एक तुलनात्मक परिक्षण" असा ग्रंथराज निर्माण करावा असेही आम्ही योजले आहे. बघू.)
Monday, March 28, 2011
Subscribe to:
Posts (Atom)