Wednesday, September 02, 2009

तो.

bus stop वर उभा असताना ’त्या’ला पाहिला मी. साधारण माझ्याच वयाचा. बस ची वाट पहात उभा असलेला. थोडासा घाईत दिसला. बस लेट होती म्हणून अस्वस्थ असणार. फ़ार काही वर्णन करून सांगण्यासारखा नाही.
आम्ही दोघे तिथे उभे असताना एक माणूस एका आजीबाईला घेऊन तिथे आला. त्या आजीबाईला कुठे कात्रजला जायचं होतं. आणि चक्क तो ’त्या’ला म्हट्ला, अरे, ह्या आजीला कात्रज च्या बस मधे बसवून दे बरं का.. आणि सरळ निघून गेला!! आजीबाई बरीच म्हातारी होती. दृष्टी अधू झालेली, वाकून चालणारी. ती काळजीत होती. आपण नीट पोचू ना, आपल्याला बरोबर बस मधे बसवून देईल ना, अशी तिला धास्ती वाटत होती. तिने ’त्या’चा हातच धरून ठेवला, व स्वतःला बरोबर बस मधे बसवून द्यायची विनंती केली. ’त्या’चा चेहरा त्रस्त झाला. ’हे काय नस्तं लचांड गळ्यात पडलं!’ असा विचार आला असणार त्याच्या मनात. त्याला बहुधा दुसरीकडे कुठेतरी जायचं होतं व आधीच उशीर झाला असणार. त्यात आता पुन्हा कात्रजच्या बसची वाट बघा!!

थोड्या वेळातच त्याची बस आली. मलाही त्याच बसमधे जायचं होतं. त्याने आजीबाईचा हातातून आपला हात बळेच सोडवून घेतला व त्याच्या बसमधे चढला. आजीबईने असहाय्यतेने मारलेली हाक त्याच्यापर्यंत पोचली की नाही कुणास ठाऊक! घरी पोचल्यावर मी विचार केला, की हे बरोबर की चूक? उगाच त्याला कशाला नावे ठेवायची? त्यालासुद्धा खरंच घाई असू शकेल की! पण झालं हे काही बरोबर झालं असं वाटेना. काहीतरी हुरहुर लागून राहिली.

काही दिवसाने ’तो’ मला परत दिसला. नक्कीच! तोच तो! रोज खिडकीजवळ गेलो, की एका ठिकाणी दिसायचा तो. वाटायचं, त्याला जाऊन विचारावं, तसं का वागलास तू? मात्र हिंमत कधीच झाली नाही. मधे बरेच दिवस मी त्याला पाहिला नाही. दुसरीच कामे इतकी होती की हा विषयच मागे पडला. ब-याच दिवसांनी पुन्हा खिडकीशी गेलो तेव्हा तो दिसला. अगदी तसाच. पण थोडा धूसर झाल्यासारखा वाटला. काही कळेना! बाकी सगळं स्वच्छ दिसत होतं आणि हाच का असा धूळीच्या पडद्यामागे असल्यासारखा दिसतोय?

मी शांतपणे उठलो. एक फडकं घेऊन आरशावरची धूळ साफ केली. हां! आता दिसतोय परत व्यवस्थित! पण तरीसुद्धा मी त्याला तो मघाचा प्रश्न विचारायला घाबरतोय! न जाणो, तो खरं उत्तर द्यायचा!!